नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित राष्ट्रीय पक्षच नव्हे, तर तब्बल 14 प्रादेशिक पक्ष आणि आघाड्यांनीही शड्डू ठोकला आहे. या पक्षांचे सुमारे 105 उमेदवार नशीब आजमावत असल्याने अनेक प्रभागांतील राजकीय गणिते बिघडण्याची चिन्हे असून, प्रमुख पक्षांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी एकूण 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सभा, कोपरा सभा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवारांचा भर आहे. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या मोठ्या पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही जातीय समीकरणे जुळवत उमेदवार दिले आहेत.
एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, रिपाइं (खोरीपा गट), आम आदमी पार्टी (आप), नांदेड विकास पार्टी, मजपा, इंडियन डेमॉक्रॅटिक मुव्हमेंट, समाजवादी पार्टी, बसपा, माकप, भाकप, संभाजी ब्रिगेड आणि एआयएएमईएएम या 14 पक्षांचे उमेदवार विविध प्रभागांत लढत आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यातच प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी काही प्रभागांत जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. जर या उमेदवारांनी आपल्या प्रभावक्षेत्रात मते घेतली, तर मतांचे ध्रुवीकरण होऊन प्रमुख उमेदवारांना जबर फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
एमआयएम, वंचितचा प्रभाव
काही विशिष्ट प्रभागांमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव दिसून येत आहे. प्रमुख पक्षांची मते विभागली गेल्यास आणि या पक्षांनी मतांचे ध्रुवीकरण केल्यास निकाल धक्कादायक लागू शकतात. महायुती आणि आघाडीतील मित्रपक्ष स्वतंत्र लढत असल्याने त्याचा थेट फायदा या प्रादेशिक पक्षांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणाचे किती उमेदवार?
प्रादेशिक आणि छोट्या पक्षांनी काही ठिकाणी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. यात एमआयएमने सर्वाधिक 37 उमेदवार दिले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे 18 उमेदवार (काँग्रेससोबत आघाडी) रिंगणात आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 6, बसपा - 9, मनसे, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, एआयएएमईएएम, मजपा (प्रत्येकी 4), आप आणि इंडियन डेमॉक्रॅटिक पार्टी (प्रत्येकी 3), तर भाकप, रिपाइं आणि नांदेड विकास पार्टीचे प्रत्येकी 2 उमेदवार मैदानात आहेत.