नांदेड : नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या 2025 -26 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण हे इतिहास घडविणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलणार आहे. असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
नांदेड महापालिकेच्या स्थापनेपासून नांदेड महापालिकेत एकदा शिवसेना व नऊ वेळा काँग्रेसचा महापौर झाल्याचा इतिहास आहे. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी कधीही काँग्रेस शिवाय इतर पक्षांची नांदेड महापालिकेत डाळ शिजू दिली नाही, ही बाब सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाण आता भाजप मध्ये आहेत. नांदेड हा चव्हाणांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या निवडणुकीतही चव्हाण व त्यांच्या चमुने महापालिकेच्या निवडणुकीत जी व्यूहरचना केली. ती वाखाणण्याजोगी आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) यांच्या मध्ये सुरुवातीस चर्चे गुऱ्हाळ चालले मात्र अंतिम टप्प्यात चर्चा फिस्कटली. त्यामुळे भाजपने 67 उमेदवार देऊन रणशिंग फुंकले, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यात दक्षिमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती न करता 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने शिवसेनेतील इतर आमदारांतील वाद चव्हाट्यावर आला. उत्तरमध्ये शिवसेना व राष्ट्रवाादी काँग्रेसमध्ये युती झाली. शिवसेना आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपनेते अशोक चव्हाण यांच्यावर बरीच आगपाखड केली. त्याचा कितपत उपयोग झाला हे लवकरच कळणार आहे.
नांदेड महापालिकेचा इतिहास पाहिला तर महापालिकेवर अशोक चव्हाण यांचा कायम वर चष्मा राहिलेला आहे. आजतागायत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), एमआयएम या पक्षांना कधीही आपली ताकद महापालिकेत दाखविता आली नाही. मात्र, या निवडणुकीत अशोक चव्हाण विरोधात महायुतीतील शिवसेना, भाजप, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी यासह 14 प्रादेशिक पक्षाचे 491 उमेदवार रिंगणात आहेत.
त्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली. याचा फायदा काँग्रेसला व वंचित बहुजन आघाडीला कितपत फायदा होईल हे कळेल. प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी चव्हाण यांना टार्गेट करत त्यांच्यावर बरीच टीका केली मात्र,त्यांना चव्हाणांनी सभांमधून चोख प्रतिउत्तर दिले. चव्हाणांनी मुस्लिम मतांच्या विभागणीसाठी व मजपाला मैदानात उतरविल्याचा आरोपही केला. चव्हाणांनी आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित असल्याचे सांगत विरोधकांची हवाच काढून टाकली.
अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासासाठी केलेले काम, गुरुता गद्दीच्या माध्यमातून साधलेला विकास, शहरात आणलेले विकासाचे प्रकल्प यांसह अनेक मुद्द्यांंवर हात घालत सभां गाजवल्या. चव्हाणांनी ज्या प्रभागात उमेदवार उतरविले आहेत बहुतांश प्रभागांत प्रचार सभा घेत विकासाचा अजेंडा जनते समोर ठेवला. त्यामुळे कालही चव्हाण आजही चव्हाण असे चित्र नांदेड महापालिकेत पाहिल्यास फारसे आश्चर्य वाटावयास नको. काँग्रेसमध्ये असताना चव्हाणांनी काँग्रेसला नंबर एक पक्ष ठेवला आता भाजपला नंबर एक पक्ष बनविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. जे नांदेड महापलिकेच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं ते आता घडणार असून, महापालिकेत पहिल्यांदाच कमळाची एंट्री होऊन भाजपचाच महापौर होणार असे भाकित राजकीय विश्लेषक करत आहेत.
असा आहे महापौरांचा कार्यकाळ
नांदेड नगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळी पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण हे होते, त्यानंतर नांदेड - वाघाळा महानगरपालिकेची स्थापना झाली . सुधाकर पांढरे हे शिवसेनेचे (1997 - 98) पहिले महापौर झाले, त्यानंतर मंगला निमकर या (1998-99) महापौर झाल्या,गंगाधर मोरे (1999-2002), ओमप्रकाश पोकर्णा (2002 - 2005),अब्दुल सत्तार (2012 - 2015), शैलजा किशोर स्वामी (2015 - 2017), शीला किशोर भवरे (2017-2019), दीक्षा धबाले (2019 -2020), मोहिनी येवनकर 2020 या कार्यकाळात काँग्रेसचेच नऊ महापौर राहिले आहेत.