Nanded village development pudhari photo
नांदेड

Nanded village development : बारड वर्षानुवर्षे अस्वच्छतेच्या विळख्यात!

नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात; कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, उखडलेले पेव्हरब्लॉक,पथदिव्यांचा प्रश्न कायम

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : गेल्या आठवड्यात नागरिकांनी प्रशासनासमोर गावातील गलितगात्र विकासाची व्यथा मांडूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, जीर्ण रस्ते, उखडलेले पेव्हरब्लॉक, चिखल व बंद पथदिव्यांचा प्रश्न कायम आहे. याबाबत नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे. दरम्यान, गावातील जावयावर नाले सफाईची वेळ आली असून त्याचे छायाचित्रही सीइओ महेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचले आहे.

गेली अनेक वर्षे बारडमधील काही भागांतील केरकचरा जाणीवपूर्वक उचलला जात नाही. घंटागाडी गावात असूनही दोन दोन - चार चार दिवस पोहचत नाही, म्हणून लोकांना उघड्यावर कचरा टाकावा लागतो. कवळे मार्केट ते गुंफा, ज्ञानदीप नगर ते माने गल्ली रस्त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे नागरिकांना नीट चालताही येत नाही.

तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मागील प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्याची समस्या गंभीर आहे. देशमुख गल्लीत बसवलेले गट्टू पार उघडे पडले असून त्यात साचलेले गलिच्छ पाणी वाटसरूंच्या अंगावर उडत आहे. यावर आता नागरिकांकडून उघड्या पडलेल्या गट्टूंना 'उपरोधक नावे' ठेवली जात असून गावभर टीकास्त्रही सुरू आहे. काही ठिकाणी पथदिव्यांचा प्रश्नही कायम आहे. शाळेच्या मागच्या प्रवेश द्वाराजवळ मुरुम म्हणून खडकाचे मोठे टोळ टाकल्याने रोगापेक्षा इलाज भारी केल्याची बाब समोर आली आहे.

मुख्य बाजारपेठेतील कमानी जवळ असलेल्या केश कर्तनालयांसमोर पावसाचे पाणी कायम साचत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या नाल्यांच्या स्लॅबला भगदाड पडले असून विद्यार्थी - नागरिकांना सुरक्षितपणे चालताही येत नाही. अपघातांची शक्यता वाढली आहे. सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर त्यावर मुरूम टाकण्यात आला त्यामुळे पाऊस पडताच परिस्थिती आणखी बिकट बनलेली दिसून आली.

बारडच्या मूलभूत सुविधांची ही अवस्था धोंडीबा आठवले यांच्या उपोषणाच्या निमित्ताने गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्यासमोर मांडण्यात आली. यावेळी खा. रविंद्र चव्हाण आणि तहसीलदार देऊळगावकरही उपस्थित होते. गावात सध्या प्रशासक ‘राज’ असले तरी अस्वच्छतेचा प्रश्न फार पूर्वापार पासून गंभीर असून यापूर्वी मंत्रालयात तक्रारी करूनही आवाज उठवण्यात आला होता.

जावयावर आली नालेसफाई करण्याची वेळ...!

बारड गावातील नालेसफाईकडे ग्रामपंचायतीचे अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष आहे. नाले सफाईच होत नसल्याने प्रतिष्ठित उद्योजक असलेल्या बारड गावच्या जावयावर स्वतः आपल्या घरासमोरील नालेसफाई करण्याची वेळ आली आहे. ते छायाचित्र थेट ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचले असून त्यासंदर्भात आता गावभर चर्चा सुरू आहेत. हे छायाचित्र जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही पोहचले असून त्यांनी बारड गावची गोपनीय भेट घेऊन गावची विपरीत परिस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी आठवले यांनी उपोषणादरम्यान केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT