Umri MSEB Power Cut News
नरेंद्र येरावार
उमरी : उमरी तालुक्यातील जवळपास 11 गावात 25 % लोकांकडे वीज वितरण कंपनीची थकबाकी आहे. त्यांच्या थकबाकीमुळे संपूर्ण अकरा गावांचा सुमारे 48 तासांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे अकरा गावातील नागरिकांना अंधारात राहावे लागले. काही गावात ग्रामसभा झाल्या आणि काही गावांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर काही गावांनी थकबाकी भरली. त्यामुळे काही गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
परंतु, अजूनही काही गावे अंधारातच आहेत. वीज वितरण कंपनीची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी थकीत वीज बिल भरावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. माञ, अजूनही काही गावांकडे 40 व 50 टक्के थकबाकी आहे. त्या गावाचा वीजपुरवठा खंडित आहे. जोपर्यंत थकबाकीदारांकडून थकबाकी भरली जाणार नाही, तोपर्यंत त्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असेही वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
उमरी तालुक्यातील अकरा गावे वीज वितरण कंपनीच्या यादीत 25 टक्केच्या आत वीज बिल वसुली असल्याच्या कारणामुळे मुख्य अभियंता नांदेड यांच्या आदेशावरून शेलगाव, कुदळा, सिंधी, इज्जतगाव, पट्टी, आबादी, बर्डी, अब्दुल्लापूरवाडी, भायेगाव, इळेगाव, मनुर गावांचा वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी दोन वाजता पूर्ण बंद करण्यात आला. गेल्या दोन दिवसापासून अकरा गावातील वीज पुरवठा बंद असल्याकारणाने याचा फटका गावातील शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, काही ठिकाणी पाणीपुरवठय़ावर गंभीर परिणाम झाला तर सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णत: अंधारात राहिले.
सध्या जिल्हा परिषदेच्या मुला मुलींच्या परीक्षा आहेत. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी, फिल्टर प्लॅन, मोबाईल चार्जिंग, बिबट्याचा वावर सह अनेक समस्या नागरिकांना सोसाव्या लागल्या. उमरी विभाग अंतर्गत 11 गावे बंद करण्यात आली. तसेच गोळेगाव व उमरी अंतर्गत 23 गावे बंद करण्याचाही इशारा वीज वितरण कंपनीकडून देण्यात आला. ग्राहकांनी वीज बिल वसुली तात्काळ भरून विद्युत पुरवठा चालू करून घ्यावा असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
तालुक्यात घरगुती ग्राहकांची थकबाकी जवळपास 75 लाख रुपये एवढी आहे. तर काही गावात 25,40,50 टक्केच्या आत वीज बिल वसुली असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तालुक्यातील खंडित करण्यात आलेल्या अकरा गावात जवळपास साडेतीन हजार ग्राहक आहेत. वीज वितरण कंपनीची थकबाकी तत्काळ भरून विद्युत पुरवठा चालू करून घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता शरद जगदाळे यांनी केले आहे. वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाचे वीजपुरवठा पूर्णपणे चालू असून दिवसातून आठ तास विद्युत पुरवठा चालू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काही लोकांच्या थकबाकीमुळे इतर गावातील लोकांना नाहक त्रास देण्याचा प्रकार झाला आहे. वीज पुरवठा खंडित करून लोकांच्या जीवांशी खेळण्याचा प्रयत्न होऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हंगिरगा येथील महिला सरपंच सौ. विजयमाला सुभाष पवार यांनी दिला आहे. तर काही गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांना थकीत वीज बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे. थकीत वीज बिल न भरल्यास त्यांच्यावर मात्र कारवाई होणार हे निश्चित आहे.