Umri Railway Station Construction updates
उमरी : तालुक्याचे ठिकाण असलेल्या उमरी येथे दळणवळणासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने दररोज प्रवाशांची लक्षणीय वर्दळ असते. सध्या रेल्वे स्थानकावर विकासकामे सुरू असली, तरी कंत्राटदाराच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
विकासकामांच्या नावाखाली स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असली, तरी तो मार्ग व्यवस्थित नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या मार्गावर ऑटोरिक्षा व इतर खाजगी वाहने उभी राहत असल्याने वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
उमरी हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्याने निजामाबाद, बासर, धर्माबाद, करखेली, बोळसा, शेलगाव, शिवणगाव, मुदखेड, मुगट, नांदेड, परभणी तसेच संभाजीनगर येथून व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार व अधिकारी रेल्वेने नियमित प्रवास करतात. त्यामुळे येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने स्थानकाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि कामे सुरू आहेत.
मात्र, या कामांमध्ये कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येते. कामाचा दर्जाही समाधानकारक नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, स्थानकावर रेल्वे पोलिसांची चौकी उभारण्यात आली असली, तरी तेथे कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही अपुरी असल्याचे चित्र आहे.
याशिवाय, सुरू असलेल्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाळूऐवजी मातीमिश्रित सामग्री आणि कमी दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवराज मोकमपल्ले यांनी केली आहे.