उमरखेड : पावसासाठी ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का अदा करताना मुस्लिम बांधव  Pudhari
नांदेड

Nanded Rain | उमरखेडमध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का; मुस्लिम बांधवांची सामूहिक दुआ

‘या अल्लाह, रहमतीचा पाऊस बरसव’ची आर्त हाक

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Namaz E Istisqa

उमरखेड : मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पावसाअभावी पिके, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ११) उमरखेड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज-ए-इस्तिस्का अदा करून पावसासाठी अल्लाहकडे सामूहिक दुआ केली.

शहरातील विविध मशिदींचे इमाम, बुजुर्ग, वयोवृद्ध, तरुण तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर उपस्थित होते. नमाज-ए-इस्तिस्कानंतर पावसासाठी आर्तपणे प्रार्थना करण्यात आली.

‘या अल्लाह, आम्हाला फायदेशीर, आरोग्यदायी आणि उपयुक्त असा पाऊस दे. तुझ्या सेवकांना आणि जनावरांना पाणी दे. तुझी दया वाढव आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जमिनीला पुन्हा जीवन दे,’ अशी सामूहिक दुआ करण्यात आली.

पावसाअभावी शेती संकटात

यंदाच्या पावसाच्या अनिश्चिततेचा थेट परिणाम शेतीवर होत असून, अनेक भागांतील पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास पिकांचे नुकसान होण्यासोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसासाठी करण्यात आलेल्या सामूहिक प्रार्थनेतून शेतकरी आणि नागरिकांच्या मनातील चिंता प्रकर्षाने व्यक्त झाली.

काय आहे नमाज-ए-इस्तिस्का?

पावसासाठी अल्लाहकडे विनंती करण्यासाठी नमाज-ए-इस्तिस्का अदा केली जाते. ईदच्या नमाजाप्रमाणे ही नमाज मोकळ्या मैदानात किंवा ईदगाहमध्ये अदा करण्याची परंपरा आहे. अजान किंवा इकामत न देता दोन रकअत नमाज अदा केली जाते. त्यानंतर प्रवचन, पश्चात्ताप आणि पापांची क्षमा मागून अल्लाहकडे पावसासाठी दुआ केली जाते.

या वेळी प्रार्थनेच्या पद्धतीत बदल करणे किंवा चादर उलटणे यांसारख्या प्रथा अल्लाहच्या रहमतीची अपेक्षा आणि परिस्थितीत बदलाची आशा यांचे प्रतीक मानल्या जातात.

दरम्यान, ‘या अल्लाह, आपल्या रहमतीचा पाऊस बरसव आणि उमरखेडसह संपूर्ण राज्यात सुख-समृद्धी प्रदान कर,’ अशी सामूहिक दुआ करण्यात आली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या आशा या सामूहिक प्रार्थनेतून अधोरेखित झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT