Umarkhed Chief Officer
उमरखेड : उपविभागातील महागाव व ढाणकी या नगरपंचायतींना स्थापनेपासून आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. सध्या उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्याकडे उमरखेडसह महागाव व ढाणकी अशा तीन नगरपंचायतींचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र, एकाच अधिकाऱ्यावर तीन शहरांची जबाबदारी असल्याने प्रशासनावर ताण वाढला असून त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होत असल्याचे दिसून येत आहे.
महागाव नगरपंचायतीची स्थापना होऊन जवळपास दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी येथे अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. स्थापनेनंतर केवळ एकदाच नियमित मुख्याधिकारी मिळाले होते, त्यानंतर आजपर्यंत कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांमार्फतच सुरू आहे. ढाणकी नगरपंचायतीची परिस्थितीही याचप्रमाणे असून तेथेही कायमस्वरूपी अधिकाऱ्यांचा अभाव कायम आहे.
कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नाल्यांची कामे यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. तसेच नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव जाणवत असून, अनेक महत्त्वाचे निर्णय रखडत असल्याचे चित्र आहे.
शहरांचा वाढता विस्तार, लोकसंख्या आणि नागरी गरजा लक्षात घेता प्रत्येक नगरपंचायतीसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे अत्यावश्यक आहे. मात्र शासन स्तरावरून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्षम प्रशासन आवश्यक असताना, कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या अभावामुळे अनेक प्रस्तावित विकासकामे केवळ कागदावरच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तीन नगरपंचायतींचा एकाच वेळी प्रभार असल्याने सर्व ठिकाणी समान लक्ष देणे शक्य होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे विकासकामांचा वेग मंदावला असून नियोजन व अंमलबजावणीवरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे महागाव व ढाणकी नगरपंचायतींसाठी तातडीने स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.