Umarkhed Dhanki Road Tractor Explosion
उमरखेड : ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंगचे काम सुरू असताना टायरजवळील हवेच्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास उमरखेड-ढाणकी मार्गावरील किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर ही थरारक घटना घडली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की ट्रॅक्टरजवळ उभे असलेले काही जण सुमारे २० फूट अंतरावर फेकले गेले. परिसरातील वाहनांच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे उमरखेडसह बाळदी परिसरात खळबळ उडाली.
या दुर्घटनेत अविनाश केशव बेले (३२, रा. बाळदी) आणि साजेब खान अनिस खान (१५, रा. उमरखेड) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये सै. उमेर सै. अनिस (१७), वासीद खान रशीद खान (३२), शेख जावेद शेख बाबू (१९), सै. जोहान सै. मोबीन (१४), सलमान खान शेरुखान (३४), ट्रॅक्टरमालक आप्पाराव बोक्से (५४) आणि त्यांचा मुलगा वैभव बोक्से (रा. बाळदी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळदी येथील आप्पाराव बोक्से यांच्या मालकीचा एमएच २९ व्ही २५२८ क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरला जातो. ट्रॅक्टरला वेल्डिंगचे काम करण्यासाठी शनिवारी सकाळी तो किसान वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आणण्यात आला होता. वेल्डिंगचे काम सुरू असतानाच ट्रॅक्टरच्या टायरजवळील हवेच्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. क्षणार्धात झालेल्या या स्फोटामुळे परिसर हादरला. ट्रॅक्टरजवळील व्यक्ती दूर फेकल्या गेल्या, तर वर्कशॉप परिसरासह रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या.
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक साजिद जहागीरदार आणि काँग्रेसचे सोनू खतीब यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना मालवाहू वाहनातून उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अविनाश बेले आणि साजेब खान यांना मृत घोषित केले. गंभीर जखमींपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून, अन्य जखमींवर उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील, ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मलकुवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरले जाणारे स्फोटक साहित्य अथवा डिटोनेटर असण्याची शक्यता व्यक्त झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले. घटनेचा पंचनामा करून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
सदर ट्रॅक्टरचा वापर विहिरी आणि खाणींमध्ये ड्रिलिंग करून ब्लास्टिंगच्या कामासाठी केला जात असल्याचे सांगण्यात येते. अशा कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनातून डिटोनेटरसह इतर साहित्याची वाहतूक केली जाते का, याबाबतही तपास केला जात आहे.
टायरजवळील हवेच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत असले, तरी स्फोटाची तीव्रता पाहता ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर किंवा अन्य स्फोटक साहित्य होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
उमरखेड-ढाणकी मार्गालगत शाळा, महाविद्यालये आणि मोठी वर्दळ असलेल्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा तैनात असतानाच दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.