Nanded Noise Pollution  AI
नांदेड

Nanded News | डीजे बंदी झुगारली: दहीहंडीतील दणदणाट आयोजकांना भोवला; उमरखेडमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हे

उमरखेडमध्ये सलग दोन दिवस कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nanded Noise Pollution

उमरखेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांसह उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी डीजेच्या वापरावर निर्बंध घातलेले असतानाही उमरखेड शहरात दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे समोर आले आहे. सलग दोन दिवस घडलेल्या या प्रकारांप्रकरणी उमरखेड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एका कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या पुढाकाराने, तर दुसरा कार्यक्रम नितीन भुतडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

पहिली घटना १२ सप्टेंबर रोजी पुसद रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोरील मैदानावर घडली. सिद्धेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात चार ते पाच फूट उंचीचे मोठे बॉक्स, तसेच केबलला लटकविलेले सहा बॉक्स लावून मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम वाजविण्यात आली.

या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल चंदन जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आयोजकांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३(१) अन्वये जारी केलेल्या डीजे बंदीच्या आदेशाची माहिती दिली होती. पोलिस निरीक्षकांनी आयोजकांना लेखी नोटीसही बजावली होती. मात्र, त्यानंतरही आदेशाचे पालन न केल्याने अध्यक्ष जस्वीन घनघाव (वय २८, रा. फैलपुरा, उमरखेड) आणि विनायक पोहुरकर (वय ३०, रा. महात्मा गांधी वॉर्ड, उमरखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी घटना १३ सप्टेंबर रोजी पुसद रोडवरील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या मैदानावर घडली. नितीन भुतडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात स्टेजच्या दोन्ही बाजूंना तब्बल १२ बॉक्ससह मोठी साउंड सिस्टीम लावण्यात आली होती.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भगवान मुसळे यांनी फिर्याद दिली. डीजे बंदीच्या आदेशाची माहिती आयोजकांना देण्यात आल्यानंतरही त्याचे उल्लंघन केल्याने प्रणित प्रदीप मैड (वय ३२, रा. फैलपुरा, उमरखेड) आणि डीजे ऑपरेटर सूर्यकांत रामराव लांडगे (वय ३२, रा. गणेशनगर, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उमरखेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दहीहंडी उत्सवात सलग दोन दिवस डीजे बंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT