माजी नगराध्यक्ष तरोडेकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी! pudhari photo
नांदेड

Vyankatrao Deshmukh Tarodekar statue : माजी नगराध्यक्ष तरोडेकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी!

पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः विद्यमान महापौर कविता मुळे आणि माजी महापौर सतीश देशमुख यांच्या प्रभागाशी संबंधित ‌‘तरोडेकर चौक‌’ त्यांच्या नावाने नव्हे तर एका ‌‘बार‌’च्या नावाने ओळखला जात आहे, याकडे लक्ष वेधत शहरातील या चौकाचे सुशोभीकरण करण्याची व तेथे व्यंकटराव देशमुख तरोडेकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

व्यंकटराव देशमुख तरोडेकर हे नांदेड नगरीचे दुसरे नगराध्यक्ष होते. नंतर ते आधी आमदार आणि मग खासदारपदी निवडून आले होते. नांदेड शहराच्या उत्तर भागात शहर आणि दोन्ही तरोडा गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील चौक तरोडेकरांच्या नावे ओळखला जातो; पण मागील काही वर्षांत या चौकाची दुर्दशा झाली असून तेथे असलेल्या ‌‘राज बार‌’ मुळे या चौकाला ‌‘राज कॉर्नर‌’ असे सर्रासपणे संबोधले जाते. त्याच्या पलीकडच्या बाजूस महापौरांचा प्रभाग आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे शनिवारी नांदेडमध्ये आले असता तरोडा (बु.) भागातील संदीप देशमुख तरोडेकर यांनी सावे यांची भेट घेऊन तरोडेकर चौकाचे सुशोभीकरण आणि तेथेच त्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी केली. तत्पूर्वी याच मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांनाही देण्यात आले. आधी त्यांनी हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला; पण त्यांनी निवेदन स्वीकारल्याचे सांगण्यात आले.

नांदेड मनपातील भाजपाचे कारभारी पूर्वाश्रमीचे काँग्रेसी कार्यकर्ते आहेत. दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर येताच या कारभाऱ्यांनी शहरामध्ये वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय पहिल्याच बैठकीमध्ये घेतला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता व्यंकटराव तरोडेकर यांच्या पुतळ्याची मागणी पुढे आणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मनपात समाविष्ट झालेल्या दोन्ही तरोडा गावांमध्ये मागील शतकात व्यंकटराव तरोडेकर यांचा मोठा दबदबा होता. आज या भागाचा मोठा विस्तार झाला असून त्याचा पाया तरोडेकर यांनी व नंतर त्यांच्याच अनुयायांनी घातला.

अन्यथा अनुयायांकडून आंदोलन करण्याचा इशारा

नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण, श्यामराव कदम, साहेबराव बारडकर या जुन्या नेत्यांचे पुतळे स्थापित झाले. मग नांदेड नगरीचे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषविणाऱ्या व्यंकटराव तरोडेकर यांचा पुतळाही स्थापित झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांच्या अनुयायांनी मांडली असून गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT