Nanded city encroachment pudhari photo
नांदेड

Nanded city encroachment : तरोडा नाका मोकळा श्वास कधी घेणार?

मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम थंड बस्त्यात

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरातील प्रमुख चौकांपैकी एक समजला जाणारा तरोडा नाका व परिसर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असून हा चौक यातून कधी मुक्त होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शहरातील काही भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली होती. देगलूर नाका, इतवारा, मोर चौक, काबरा नगर आदी ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवून त्या परिसरातील बऱ्यापैकी अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाच्या या मोहिमेचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले होते.

ही मोहीम शहरातील तरोडा नाक्यासह अन्य भागात राबविली जाईल, असे वाटत असतानाच मनपाने ही मोहीम अचानक थांबवली. तरोडा नाका व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत. परिणामी भरचौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहेे. या चौक परिसरात मांस विक्रीची अनेक दुकाने असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते. अरुंद रस्त्याच्या मधोमध शेतकरी पुतळा उभारण्यात आल्यामुळे या पुतळ्याचीही अवहेलना होत आहे.

विशेष म्हणजे या चौकात ऑटो थांबा नसल्यामुळे ऑटो चालक भररस्त्यावर ऑटो उभे करून वाहतुकाला अडथळा निर्माण करीत आहेत. ऑटोसाठी स्वतंत्र थांबा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रलंबित असतानाही मनपाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मालेगावकडे जाणाऱ्या कॅनॉल रस्त्यावरही वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलची व्यवस्था तसेच वाहतुक पोलिस नसल्यामुळे तासनतास येथे वाहतूक विस्कळीत होत असते. बुधवारचा बाजार अन्यत्र हलविण्याची मागणी होत असतानाही रस्त्याच्या दुतर्फा बाजार भरवला जातो. बुधवारी चारचाकीच नव्हे, तर दुचाकी वाहन चालविणेही तारेवरची कसरत बनत आहे.

  • अतिक्रमण,वाहतुकीची कोंडी, मांस विक्री व त्यामुळे होणारी दुर्गंधी, बुधवारचा बाजार, अरुंद रस्ते, त्यामुळे होणारे अपघात आदी अनेक समस्यांनी वेढलेला तरोडा नाका मोकळा श्वास कधी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापौर कविता संतोष मुळे यांचे निवासस्थान तरोडा नाक्यापासून काही अंतरावर असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष व्हावे, याचे आश्चर्य वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT