

जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १७) रेवगाव रोड परिसरात कारवाई करून दोन गावठी बनावटीची पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणी सुमित ऊर्फ गोल्या राजू भुरे (वय २५, रा. कानडी वस्ती, जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. सोमवारी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना सुमित ऊर्फ गोल्या राजू भुरे याच्याकडे रेवगाव येथे दोन गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
पोलिस पथकाने कलश सिड्स बीएआरएस फर्मसमोरील रोडवर, रेवगाव रोड, जालना येथे सुमित भुरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तूल आढळून आली. पोलिसांनी जप्त केलेल्या दोन्ही पिस्तुलांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. करून आरोपीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी, जालना विभाग अंतर्गत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
८० हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीच्या दोन गावठी बनावटीच्या पिस्तुलांसह मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमध्ये सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, आकाश धांडो आणि बाबा गायकवाड यांनी सहभाग घेतला.