Takalgaon Takbid road
नायगाव : अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील टाकळगाव-ताकबीड हा मुख्य रस्ता मागील चार-पाच दिवसांपासून खचल्याने बंद होता. परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
रस्ता तुटून शेतात पाणी घुसले,पावसाचे पाणी निचरा न झाल्याने नाले व नाल्यांची दुरवस्था उघडकीस आली. नाल्याचे पाणी थेट शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पळसगाव येथील शेतकरी पत्रकार अरविंद शिंदे यांच्या शेतात आजही पाणी साचलेले असून त्यांची जमीनत वाळू ,गिट्टी,दगड,वाहून आले आहेत.जमीन पूर्ण पने पाण्याखाली गेली आहे. जुना बंधारा तसाच ठेवल्याने लाकूड व पुरसन अडकून पाणी शेतात शिरले आहे.आणि मोठे नुकसान झाले. त्यामुळे शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते.
नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही काही ठोस हालचाल दिसत नव्हती. मात्र ‘दैनिक पुढारी’मध्ये बुधवारी सकाळी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तातडीने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली. आणि पाच दिवसांपासून बंद असलेला टाकळगाव-ताकबीड रस्ता आज पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला.
गावकऱ्यांनी या कामाचे स्वागत केले असले तरी “फक्त बातमी आली म्हणून कारवाई झाली, आधीच पुढाकार घेतला असता तर जनतेला एवढा त्रास सहन करावा लागला नसता,” असा टोला प्रशासनाला गावकऱ्यांनी लगावला आहे.