Nanded cyber fraud pudhari photo
नांदेड

Nanded cyber fraud : लोन ॲपच्‍या नावाखाली ५६ लाखांचा गंडा

नांदेड : मॉर्फ फोटोंचा वापर करून तरुणाला ब्लॅकमेल

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : सायबर फ्राॅडचा लोगो वापरावा ‘एस. व्ही. क्रेडिट’ नावाच्या अ‍ॅपवरून ऑनलाईन लोन घेणे एका तरुणाच्या भलतेच अंगाशी आले आहे. फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ व फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत अज्ञात भामट्यांनी तरुणाची तब्बल ५६ लाख ६५ हजार ६० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लईजाई नगरी येथील रहिवासी नारायणराव पावडे (वय २३) यांनी १ मार्च २०२५ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन लोन अ‍ॅप ‘एस. व्ही. क्रेडिट’च्या माध्यमातून व्यवहार केला होता. दरम्यान, अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांनी संगनमत करून पावडे व त्यांच्या मामे बहिणीचे फोटो सोशल मीडियावरून मिळवले. हे फोटो संगणकीय प्रणालीद्वारे 'मॉर्फ' करून त्यांचे अश्लील छायाचित्रे तयार करण्यात आली.

या अश्लील छायाचित्रांचा वापर करून संशयितांनी ही चित्रे फिर्यादीच्या नातेवाईकांना व मित्रांना पाठवण्याची आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलिंगला घाबरून पावडे यांनी भामट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ५६ लाख ६५ हजार ६० रुपये पाठवले.

सतत होणाऱ्या त्रासाला आणि वाढत्या मागणीला कंटाळून अखेर नारायणराव पावडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद (गु.र.नं. १६/२०२६) करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत सप्रे करत आहेत.

सुरक्षितता बाळगा

अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना काळजी घ्या: ऑनलाईन लोन अ‍ॅप इन्स्टॉल करताना मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स आणि गॅलरीचे अ‍ॅक्सेस (Permissions) देऊ नका. घाबरू नका, तात्काळ तक्रार करा: अशा प्रकारे कोणी ब्लॅकमेल करत असल्यास घाबरून पैसे देणे टाळा व त्वरित नजीकच्या सायबर पोलीस ठाण्याशी किंवा '१९३०' या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. डिजिटल सुरक्षेबाबत सतर्क राहा: सोशल मीडियावरील प्रोफाईल लॉक ठेवा आणि अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

अनोळखी लोन अ‍ॅपपासून सावध राहा!

नागरिकांनी ऑनलाईन लोन देणाऱ्या अनधिकृत आणि संशयास्पद अ‍ॅप्सच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच वैयक्तिक माहिती किंवा फोटो अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT