Nanded Suspicious death of farmer
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: हदगाव तालुक्यातील डोरली येथील रहिवासी कैलास विश्वनाथ काटेकर हा शेतकरी काल सायंकाळी शेतात आखाड्यावर झोपण्यासाठी गेला. परंतु सकाळी दररोजच्या वेळी परत न आल्यामुळे पत्नी दहा वाजता शेतात गेली असता तीला आपला पती मृतावस्थेत आढळून आला.
याप्रकरणी मयताची पत्नी शितल हीने हदगांव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. हदगाव तामसा महामार्गावर हदगाव पासून दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोरली येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास विश्वनाथ काटेकर यांची गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बागायती शेती आहे. त्यांच्या शेतामध्ये सध्या हळद लागवड करण्यात आलेली असून पाण्यासाठी बोअरवेल आहे.
याच शेतामध्ये राहण्यासाठी छोटेशे पत्राचे शेड म्हणजे आखाडा आहे. गावापासून थोडे दूर असल्यामुळे शेतात चहापाणी आणि एखाद्यावेळी गावाकडे नाही जाणे झाल्यास शेतातच जेवण बनवण्यासाठी व्यवस्था होईल असे खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. काल सायंकाळी कैलास हे आपल्या शेतात शेताची राखण करत शेतातच मुक्काम करण्यासाठी गेले होते.
घरून जेवण नेले नसल्यामुळे त्यांनी तिथेच वरण-भात बनवल्याचे सकाळी दिसून आले. सकाळी दररोजच्या वेळी कैलास घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय दहा वाजता जेवण आणि जेवणाचा डबा घेऊन आखाड्यावर गेले असता तिथे कैलास याचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला. दृश्य पाहून घाबरलेल्या पत्नीने नातेवाईकांना फोन करून सांगितले आणि हदगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली.
माहिती मिळताच स. पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवून तेथील पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.