Nanded spa center raid pudhari photo
नांदेड

Nanded Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये पोलिसांची धडक कारवाई

चार महिलांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरातील विद्युतनगर चौक, आनंदनगर रोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी (दि.७) रात्री छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

​पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना एका ‘स्पा मसाज सेंटर’मध्ये अवैध कुंटणखाना सुरू असल्याची पक्की बातमी मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे (डमी ग्राहक) या प्रकाराची शहानिशा केली. यासाठी बनावट ग्राहकाला चार हजार रुपयांची रोकड देऊन पाठवण्यात आले होते. ग्राहकाकडून निश्‍चित संकेत मिळताच रात्री नऊच्या सुमारास पथकाने अचानक छापा टाकला.

​या छाप्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळावरून गौरव राजकुमार सरपाते (वय २०, रा. राहुलनगर, हनुमानगड, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने या व्यवसायात आपली २० टक्के भागीदारी असून, पवितसंघ आरतीया (महाराज) हा ८० टक्के भागीदार असल्याचे उघड केले. ​

सुटका करण्यात आलेल्या चार पीडित महिलांमध्ये महाराष्ट्रासह आसाम राज्यातील महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईत बनावट ग्राहकास दिलेले ४ हजार रुपये आणि ५० हजार रुपयांचा ‘आयफोन १४ प्रो’ असा एकूण ५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT