Soybean Procurement Maharashtra
किनवट : नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीमध्ये सध्या लागू असलेली केवळ २ टक्के डागीची मर्यादा वाढवून ती १० टक्के करावी, अशी मागणी किनवट–माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट–माहूर हे डोंगराळ व दुर्गम तालुके असून यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ५४ दिवस सतत पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी व असामान्य हवामानामुळे सोयाबीन पिकात डागीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल व्यापारी दर्जात बसत नाही. सध्याच्या नियमांनुसार २ टक्क्यांपेक्षा जास्त डागी असलेला माल खरेदीस अपात्र ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरून माल परत न्यावा लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असून, त्यांना हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आमदार केराम यांनी मांडली आहे. नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला असून, वाढलेल्या डागी प्रमाणामुळे हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे बिकट अवस्थेतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्याची २ टक्के मर्यादा वाढवून किमान १० टक्के डागी सोयाबीन खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन नियमांत शिथिलता आणल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.