शिवरायांच्या जयंती पूर्वसंध्येस नांदेडमध्ये टोळक्याचा उच्छाद ! File Photo
नांदेड

शिवरायांच्या जयंती पूर्वसंध्येस नांदेडमध्ये टोळक्याचा उच्छाद !

नरहर कुरुंदकर मार्गावरील प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

nanded shivjayanti news

नांदेड, विशेष प्रतिनिधी : शहरातील विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६वी जयंती विधायक उपक्रमांनी साजरी केली जात असताना बुधवारच्या मध्यरात्री शहरातील अशोकनगर ते आनंदनगर भागामध्ये शिवरायांच्या तथाकथित भक्तांनी बराच काळ उच्छाद घातला. त्यावर जयंतीदिनी सकाळीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पोलिसांच्या अकार्यक्षमतेचाही पंचनामा करण्यात आला.

शिवरायांचे थोरपण अवघ्या महाराष्ट्राला नेमकेपणाने उलगडून दाखविणारे थोर समीक्षक विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे नाव ज्या मार्गाला देण्यात आले आहे, त्या मार्गावर तरुणांच्या बेभान टोळक्याने मध्यरात्री मोटारसायकल फेरीतून अक्षरशः उच्छाद घातला. या प्रकारानंतर वरील मार्गावरील वेगवेगळ्या वसाहतीतल्या रहिवाशांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे सुशासन, शिस्त आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे आवाहन महापौर कविता कविता संतोष मुळे यांनी गुरुवारी येथे केले. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर आणि आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. याप्रसंगी उपमहापौर दीपकसिंह रावत तसेच मनपाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

'दुचाकी वाहनांचा कर्कश आवाज काढत फिरणाऱ्या या तरुणांना खरे शिवाजी महाराज ज्या दिवशी कळतील, तो या राज्यातील सुदिन', अशी उपरोधिक प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगदीश कदम यांनी मध्यरात्रीच्या उच्छादावर व्यक्त केली. त्यांचे निवासस्थान याच मार्गावरील कैलासनगर भागात आहे. अशोकनगर भाग्यनगर ते आनंदनगरच्या मार्गावरील वेगवेगळ्या शिकवणी वर्गांमुळे या संपूर्ण परिसरात वर्दळ प्रचंड वाढली असून शहरातल्या वेगवेगळ्या भागांतील उनाड आणि गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी या परिसरात अशांतता तसेच दहशतही निर्माण केली आहे; पण त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात पोलिस अधीक्षकांची यंत्रणा कुचकामी ठरल्याची तक्रार या भागातील व्यावसायिकांनी गुरुवारी सकाळी केली.

शिवरायांना जयंतीनिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले; पण यानिमित्ताने झालेल्या फलकबाजीतून वरील मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांलगतच्या भागाचे अक्षरशः विद्रुपीकरण झाले. अशा अशोभनीय वातावरणात गुरुवारी सकाळपासून वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. ठिकठिकाणी महाराजांच्या गौरवाचे पोवाडे कानी पडत असताना शहरातील जाणत्या मंडळींनी मात्र एकंदर स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त केली.

साहित्यिक पिंड असलेल्या डॉ. नितीन जोशी यांनी भवतालची चिंताजनक स्थिती पाहून 'महाराज आम्हाला माफ करा', या मथळ्याखाली आपली भावना समाजमाध्यमांतून समोर आणली. अवघ्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज्याचे तोरण बांधत अनेक भागांवर राज्य करणाऱ्या शिवरायांच्या राज्यातील एकंदर विदारक स्थितीवर डॉ. जोशी यांनी बोट ठेवले. छत्रपतींनी बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील जनतेने दरमाणसी पाच-पाच रुपये गोळा केले, तर अनेक किल्ल्यांचे संवर्धन होईल. पण पाच रुपयांत वेगवेगळ्या नावांच्या पुड्या खाऊन थुंकणाऱ्या पिढीकडून असे विधायक काम होणे, अशक्य असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले. महाराजांनी रयतेच्या भल्याचा विचार केला; पण आम्ही फक्त आमचाच विचार करत आहोत. म्हणून राजे आम्हाला माफ करा, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT