MCOCA Pudhari
नांदेड

Nanded Crime : नांदेडमध्ये पाच सराईत गुन्हेगारांवर 'मोक्का'

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात 'मोक्का' अंतर्गत कायदेशीर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड: शहरात आणि परिसरामध्ये सशस्त्र दरोडा, खून, प्राणघातक हल्ले व जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांद्वारे दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार शेख इरफान ऊर्फ कुबडा आणि त्याच्या कुख्यात टोळीविरुद्ध नांदेड पोलिसांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात 'मोक्का' अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

​पोलिस सूत्रांनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना या टोळीचे गुन्हेगारी जाळे उघडकीस आले. मुख्य सूत्रधार शेख इरफान ऊर्फ कुबडा (वय २६, रा. मगदुमनगर, नांदेड) याच्यासह फिरदोस ऊर्फ शाहरुख असलमखान, मोहम्मद परवेज ऊर्फ छोटू पठाण, शेख ईमरान शेख गोस आणि शेख आयान ऊर्फ आयान मार्क लतीफ हे या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. यांच्यावर नांदेडमधील विविध पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रासह दरोडा व शस्त्र कायद्याचे उल्लंघनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

​​यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या गुन्हेगारांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या माध्यमातून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास ७ ऑगस्ट २०२६ रोजी रितसर मंजुरी मिळाली.

या कठोर कारवाईमुळे शहरातील खंडणीखोरी आणि दहशतीला मोठा आळा बसणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT