Nanded Selection of Chairperson in the Municipal Corporation
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड महानगरपालिकेत २४ मार्च रोजी होणाऱ्या स्थायी व महिला बालकल्याण सभापतिपदाच्या निवडीची लगबग सुरू झाली आहे. १६ सदस्यांमधून स्थायी समिती सभापतींची निवड होणार असून ज्येष्ठ नगरसेवक वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे. महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी प्रभाग क्र. ९ मधून निवडून आलेल्या सदिच्छा सोनी यांची वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी प्राधिकृत केलेले पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २१(१) व शासन अधिसूचनेनुसार स्थायी समितीच्या निर्वाचित १६ सदस्यांमधून सभापतीची निवड केली जाणार आहे.
याच बैठकीत ११ सदस्यांमधून महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतींचीही निवड केली जाणार आहे. दोन्ही समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही पदे भाजपाकडेच राहणार आहेत.
स्थायी समितीमध्ये भाजपचे स. वीरेंद्रसिंघ गाडीवाले, सदाशिव शंकर पुरी, आशिष नेरलकर, मुथा सुमित प्रकाश, अभिषेक सौदे, यादव तुळजाराम, दीपाली संतोष मोरे, कविता गड्डम, सरिता बिरकाले, नीलम तुलजेश यादव आदींचा समावेश आहे. यापैकी स. वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत असून खा. अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे गाडीवाले यांच्या नावाला चव्हाण झुकते माप देतील, असा अंदाज आहे.
महिला व बालकल्याण समितीमध्ये सदिच्छा सोनी पाटील, निरंजना राजू लांडगे, ठाकूर अमृताबाई बजरंगसिंह, संध्या महेंद्र देमगुंडे, सुलोचना धोंडिबा काकडे, कुंजीवाले मनप्रीतकौर अमरजितसिंघ, निलम तुलजेश यादव यापैकी सदिच्छा सोनी यांचे नाव सभापतिपदासाठी आघाडीवर असून उपसभापतिपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे. सदिच्छा सोनी पाटील या माजी सभापती किशोर स्वामी यांच्या प्रभाग क्र. ९ मधून विजयी झाल्या आहेत.