अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये सकल मातंग समाजासह लाभ वंचित जातींचा विशाल मोर्चा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. pudhari photo
नांदेड

Nanded reservation protest : अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा महामोर्चा धडकला कचेरीवर !

मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या प्रचंड घोषणाबाजीने शहर दुमदुमले

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये सकल मातंग समाजासह लाभ वंचित जातींचा विशाल मोर्चा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या प्रचंड घोषणाबाजीने शहर दुमदुमले होते. हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी या महामोर्चात सहभाग घेतला होता.

रविवारी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा महात्मा फुले पुतळा आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर -धडकला. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्य सरकारांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात उपवर्गीकरण करण्याचा मार्ग खुला केला आहे.

या निर्णयानंतर विविध राज्यांनी या दिशेने पावले उचलली असताना महाराष्ट्रातील लाभवंचित जातींना मात्र अद्याप आरक्षण उपवर्गीकरणाची प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत झाले. यावेळी नेते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून मागणी तात्काळ मान्य करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निघालेल्या या जनआक्रोश महामोर्चाच्या आयोजनासाठी सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभवंचित समाज घटकांची आयोजन समिती स्थापन करण्यात आली होती.

या मोर्चात आ. जितेश अंतापूरकर, माजी आमदार अविनाश घाटे, मारोती वाडेकर, सचिन साठे, अजिंक्य साबणे, मिलिंद आव्हाड यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी व सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT