Sarsam Himayatnagar road Unknown vehicle hits bike
हिमायतनगर : सरसम–हिमायतनगर मार्गावरील म्हसोबा नाल्याजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे मृत दोघे आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले आणि लखन पंड्या हे तिघे शुक्रवारी (दि.११) रात्री सुमारे ८.३० वाजता हिमायतनगरहून मोटरसायकलने सरसमकडे निघाले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर आणि अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना भोकरजवळ पोहोचण्यापूर्वीच अविनाश गोखले यांचा मृत्यू झाला. रमेश गुंडेकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सरसम–हिमायतनगर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हिमायतनगर तालुक्यात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सूचना फलक आणि पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
मृत अविनाश गोखले यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी दुपारी सरसम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
लखन पंड्या यांच्या पश्चात आई-वडील आणि पत्नी असा परिवार असून तेही आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. दोन्ही मृतदेहावर सरसम येथे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.