श्रीक्षेत्र माहूर (नांदेड) : धनोडा पुलापलीकडील विदर्भ हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी सबंधित गुत्तेदाराने स्थानिक महसूल प्रशासनाकडून ३०० ब्रास मुख्म उत्खनन करून त्याची ५ ऑगस्टपर्यंत वाहतूक करण्याची परवानगी घेतली.
त्यासाठी रूई येथील सर्वे नं. ५७ मधून दोन पोचकलँडद्वारे मुरुमाचे बेसुमार उत्खनन करून त्याची १० हायवा या जड वाहनातून वाहतूक सुरु ठेवली. ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक इलीयास बावाणी यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांना रीतसर तक्रार देऊन ईटीएस मोजणी करून सर्व संबधीतांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माहूर तालुक्यातील रूई येथील सर्व्हे नं. ५७ मधील एका शेतातून संबंधित गुत्तेदारास महसूल प्रशासनाने ३०० ब्रास मुरूम उत्खनन करून ६ हायवा या जड वाहनाद्वारे त्याची वाहतूक करण्याला दि. ५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच ६ दिवसाची मुदत दिली.
प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तब्बल १० हायवा या जड वाहनाद्वारे त्याची वाहतूक सुरु असल्याचा गंभीर आरोप इलियास बावाणी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तीन किमी अंतरावर केवळ ५० फेऱ्यातच ३०० ब्रास मुरुमाची वाहतूक होते, असा अंदाजही त्यांनी आपल्या तक्रारीत वर्तविला आहे.
संबंधित गुत्तेदाराने जिथे जिथे मुरुमाचे उत्खनन केले, त्या-त्या ठिकाणची ईटीएस द्वारे मोजणी करून शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या गुत्तेदारांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी आपल्या तकारीतून केली