Nanded Illegal sand mining pudhari photo
नांदेड

Nanded Illegal sand mining : नांदेडमध्ये वाळूमाफियांवर कारवाई; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

​गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर छापा; ६ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नांदेड :जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई केली आहे. आसर्जन ते मार्कड शिवारात टाकलेल्या या छाप्यात सुमारे ३ कोटी ६४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांसह इतर साथीदारांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे पथक ३० जुलै रोजी अवैध धंद्याविरोधात गस्तीवर होते. यादरम्यान आसर्जन ते मार्कड शिवारातील गोदावरी नदीपात्रात बोटी, तराफे व इंजिनाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तातडीने घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित नदीपात्रातून पसार झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून रेती उपशासाठी वापरली जाणारी अवजड यंत्रसामग्री व साहित्य जप्त केले.

​शासनाची कोणतीही परवानगी न घेता गोदावरी पात्रातून रेतीचा अवैध उपसा करून महसुलाचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी नारायण बाबुराव पुंड, विठ्ठल दशरथ डक, गोविंद बालाजी डक (तिघे रा. पिंपळगाव), सचिन श्रीसागर (रा. कल्लाळ), गंगाधर मेथेवाड आणि चंद्रकांत कामाजी लाकडे (दोघे रा. मार्कंड) यांच्यासह इतर ५ ते ६ अनोळखी इसमांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​जप्त व नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल

​तरंगणारे २११ तराफे : ₹१ कोटी ५ लाख ५० हजार (जागेवर नष्ट), ​१० मोठ्या लोखंडी बोटी : ₹१ कोटी ५० लाख (जागेवर नष्ट), ​५ लहान लोखंडी बोटी : ₹५० लाख (जागेवर नष्ट), ​१५ इंजिने : ₹४५ लाख (जागेवर नष्ट), ​२६० ब्रास रेती : ₹१३ लाख (काही साठा जागेवर नष्ट), ​इतर साहित्य : ड्रम, पाईप, टोपले, खोरे इत्यादी. एकूण जप्त मुद्देमाल : ₹३,६४,४५,८००/-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT