Sahastrakund Dam Issue Umarkhed Farmers Protest
उमरखेड : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर येवून नदीकाठावरील शेतशिवारातील शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रविवारी आमदार किसन वानखेडे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील मतखंड परिसरात गेले असता त्यांना प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधाचा सामना करावा लागला. या परिसरातील सावळेश्वर, बोरी व माणकेश्वर यासह पैनगंगा नदीकाठच्या अनेक गावातील गावकऱ्यांनी आमदारांना सहस्रकुंड प्रकल्पाच्या विरोधात चांगले धारेवर धरले .
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदारांनी सहस्त्रकुंड प्रकल्पाला मान्यता देऊन तातडीने सुरू करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. त्यामुळे या पैनगंगा नदीकाठच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील 50 गावांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून याच्या विरोधात नुकतीच आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथे विदर्भ मराठवाड्याची संयुक्त सभा पार पडली यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील सात हजार पेक्षा महिला पुरुष या सभेला उपस्थित होते. या ठिकाणी सर्वांनी सहस्त्रकुंड प्रकल्पाला कडून विरोध दर्शविला होता. कालच्या पुरात सावळेश्वर गावचे खूप नुकसान झाले.
त्यावेळी त्याची पाहणी करण्यासाठी आमदार वानखेडे सावळेश्वर गावात केले तेव्हा गावकऱ्यांनी सहस्त्रकुंड प्रकल्प संदर्भात काय मागणी केली. असे म्हणत घेराव घालीत नागरिकांनी जाब विचारला. यावेळी नागरिकांनी दोन घंटे पाऊस आला. तर अशी परिस्थिती उद्भवली. कुणाच्या दबावाखाली कुणाच्या आदेशाने आपण धरणाची मागणी कशी काय केली ? आम्हाला धरण नको आहे. या परिसरातील कसदार जमीन आहे, असे आमदार वानखेडे यांना सांगितले. यावेळी नागरिकांनी "जान देंगे मगर जमीन नही देंगे " अशा घोषणा दिल्या.
यावेळी आमदार वानखेडे यांनी सांगितले की, धरणाचा प्रस्ताव मी आमदार आहे म्हणून आला नसून हा प्रकल्प पूर्वी पासूनच सुरू आहे . अगोदर या प्रकल्पामुळे भरपूर क्षेत्र यामध्ये चालले होते ते कमी करा, अशी लोकांनी मागणी त्यावेळी केली होती . त्यामुळे प्रस्ताव जवळपास पूर्ण झाला आहे. तो नाशिक पर्यंत पोहोचला असून केवळ मंजूर होण्याचे उरले आहे. माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी मी हे करीत नसून मला निवडून दिलेल्या मायबाप जनतेसाठी मी सतत काम करत राहणार आहे . हा प्रकल्प पाहिजे की नाही पाहिजे हे जनतेच्या मनावर असून सुनावणी वेळी विरोध किती होतो? याकडे बघावा लागेल हा प्रकल्प तुम्हाला पाहिजे नसेल तर जेवढा विरोध करायचा तेवढा करा. मी तुमच्यासोबत आहे, असेही आमदार वानखेडे यांनी सांगितले. यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सहस्त्रकुंड धरण यापूर्वी दोनवेळा रद्द झाले असून मागच्या वेळी ताकदीने विरोध करून धरण रद्द केले होते. आता हदगाव व उमरखेडच्या आमदारांनी हा प्रकल्प झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या दोन्ही आमदारांना सांगणे आहे की, "झाडावरच भूत अंगावर घेवू नका "सुपीक जमीन यामध्ये जाणार असून शेतकरी उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे.- प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार तथा भाजप नेते, उमरखेड विधानसभा