Sahasrakund Hydropower Project | सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविषयी विरोधकांनी स्टंटबाजी करू नये : आमदार बाबुराव कदम
Nanded Sahasrakund Hydropower Project Issue
हदगाव : सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी थेट पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे. या विषयावर आपण खुली चर्चा करू, शेतकरी आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन अधिकाऱ्यांकडून करून घेऊ. जर जनतेला प्रकल्प नको असेल, तर तो रद्द करण्याची मागणी मी स्वतः करेन. पण केवळ राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळ करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
आ. कोहळीकर यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पैनगंगा नदी कोरडी पडते आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतात. त्यामुळेच शासनाकडून उच्च पातळी बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे. या प्रकल्पात वरच्या बाजूस सहा बंधारे आहेत, तर खालच्या बाजूस निंगणूर येथे पाणी सोडून जलविद्युत निर्मिती केली जाणार आहे.
इतिहास व सुधारित आराखडा
हा प्रकल्प मूळतः 1956 साली प्रस्तावित होता, मात्र त्यावेळी जंगल संपदा आणि अनेक गावे विस्थापित होणार असल्याने शासनाने आराखडा बदलला. जुन्या आराखड्यात 220 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता, तर नव्या आराखड्यात फक्त 33 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहील. सध्याच्या आराखड्यानुसार धरणाची उंची इतकी कमी केली आहे की एकही गाव किंवा घर विस्थापित होणार नाही.
शेतकऱ्यांना लाभ
या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांची भूसंपादित शेती रब्बी पिकासाठी उपयोगात येईल. पावसाळ्यात साठलेले पाणी निंगणूर धरणात जाऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल, अशी माहिती कोहळीकर यांनी दिली. काही लोक राजकीय हेतूने जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जनतेसोबत राहण्याची हमी
प्रकल्पाविषयी खरी माहिती मिळाल्यावर विरोध करण्याची गरजच उरणार नाही, असा मला विश्वास आहे. तरीसुद्धा, जर जनतेला प्रकल्प नको असेल, तर मी त्यांच्या सोबत राहून विरोध करीन. परंतु योग्य माहिती न घेता विरोध करणे म्हणजे अंधारात काठी मारण्यासारखे आहे, असे कोहळीकर म्हणाले.
हिमायतनगरमध्ये जनजागृती बैठक
प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसली तरी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग आणि पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ चे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत हिमायतनगर तालुक्यात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. कोहळीकर यांनी दिली.

