नांदेड :जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन क्रॅक डाऊन' अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करून चोरटी विक्री करणाऱ्या वाळूमाफियांवर धाड टाकून पोलिसांनी एकूण २४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २० जून २०२६ रोजी मध्यरात्री मार्कंड शिवारातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे आणि अंमलदार विठ्ठल भिसे, शेख गफार, जीवन तेलंग, विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. मार्कंड शिवारात तराफ्यांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करून ती नदीकाठावर साठवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रात्री १२.१० च्या सुमारास गोदावरी नदीकाठावर धाड टाकली. पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेऊन दोन अनोळखी आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून रेती उपसा करणारे ४ इंजिन (किंमत १२ लाख रुपये), पाण्यात तरंगणारे २० तराफे (किंमत १० लाख रुपये) आणि त्यावरील ४० ब्रास रेती (किंमत २ लाख रुपये) जप्त केली.
यापैकी २० तराफे, ४ इंजिन आणि ४० ब्रास रेती जाळून व नदीत टाकून जागीच नष्ट करण्यात आली. तसेच नदीकाठावर साठवून ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शेख गफार इस्माईल यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.