Illegal sand mining : नांदेड ग्रामीण पोलिसांची गोदावरी पात्रात कारवाई file photo
नांदेड

Illegal sand mining : नांदेड ग्रामीण पोलिसांची गोदावरी पात्रात कारवाई

४४.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त अन् नष्ट

पुढारी वृत्तसेवा

Nanded Rural Police conduct operation in the Godavari riverbed

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू (रेती) उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने मोठी कारवाई केली आहे. वाजेगाव व मार्कड शिवारातील गोदावरी नदीपात्रात टाकलेल्या या छाप्यात सुमारे ४४ लाख ६६ हजार रुपयांची साधनसामग्री जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्तीवर असताना, सिद्धू बालीसिंग महाराज हा इसम मजुरांच्या मदतीने बोटी, तराफे व इंजिनच्या साहाय्याने वाजेगाव व मार्कड शिवारात अवैध वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह २२ सप्टेंबरच्या पहाटे नदीपात्रात अचानक छापा टाकला. पोलिसांची धाड पडताच तीन मजूर नदीत उड्या मारून पसार झाले, तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिद्धू बालीसिंग महाराज (फरार), महेश कुमार सनब शिवनाथ (वय ३०, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), राम मनोजकुमार पि पप्पू गुंड (वय २२, रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) आणि इतर तीन अनोळखी मजुरांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

कारवाईदरम्यान जप्त केलेल्या बोटी, इंजिन, तराफे, पाईप आणि ड्रम हे गॅस कटरच्या साहाय्याने कापून व जाळून जागीच नष्ट करण्यात आले, तर १० ब्रास रेती शासनाच्या ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय व्यंकट कुसमे, विठ्ठल भिसे, गफार शेख व पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT