काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांची उचलबांगडी करा !  file photo
नांदेड

काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांची उचलबांगडी करा !

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठराव; श्रेष्ठींकडे दोन नावांची शिफारस

पुढारी वृत्तसेवा

Nanded Remove Congress City President Abdul Sattar!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या गटबाजीने टोकाचे स्वरुप घेतले आहे. पक्षात नाट्यमय घडामोडींना वेग आला असून शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना पदावरून हटविण्याची मोहीम पक्षाच्याच एका मुस्लीम गटाने सुरु केली आहे. सत्तार यांची उचलबांगडी करून माजी उपमहापौर शफी अहमद कुरेशी किंवा अॅड.म.अ. रहमान सिद्दीकी यांच्यापैकी एकाची शहराध्यक्षपदी निवड करावी, असा ठराव संमत करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.

काँग्रेसचे नगरसेवक बाबुभाई खोकेवाले यांच्या निवासस्थानी काही आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस शहराध्यक्षपदाबाबत सविस्तर चर्चा झाली. शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना पदावरून पायउतार करण्याबाबत बैठकीतील उपस्थितांचे एकमत झाले. शहर व जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन शहराध्यक्षाची निवड करणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीत उमटला.

शहराध्यक्षपदासाठी शफी अहमद कुरेशी आणि अॅड. म.अ. रहमान सिद्दीकी या दोन नावांचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या दोघापैकी एकाची निवड शहराध्यक्षपदी करावी, अशी शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.

या बैठकीला नगरसेवक बाबुभाई खोकेवाले यांच्यासह नगरसेवक सय्यद शोएब हुसेन, नगरसेवक प्रतिनिधी खाजी नाफे, अॅड. अ. बारी सिद्दीकी, फारुख अली खान, माजी नगरसेवक सय्यद शेरअली, शहर सचिव आर.एस. खान, माजी नगर सेवक प्रतिनिधी वाजीद अहेमद जागीरदार, मो. नजीब अज्जुभाई, फेरोज खान, वाजिद अन्सारी, मोहसिन खान, अ. रहीम, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्तजिबोद्दीन, डॉ. अब्दुल बाखी, शहर सचिव डॉ. मो. आसीफ, अलिम खाना पठाण, युसुफ पटेल, अब्दुल अजिजा खुरैशी, शेख जावेद चाऊस आदींची उपस्थिती होती.

नांदेड मनपा निवडणुकीपासून शहर काँग्रेस कमिटीमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पक्षश्रेष्ठींना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्याचाच परिपाक म्हणून सत्तार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीने जोर धरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

पक्ष निरीक्षक आज नांदेडात

दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह पक्षनिरीक्षक नांदेडमध्ये दाखल होणार असून नक्षत्र बँक्लेट हॉल येथे पक्षाची बैठक होणार आहे. ज्येष्ठ नेते वेणूगोपाल राव, यशोमती ठाकूर, रवींद्र दळवी या वरिष्ठ नेत्यांसह श्रीशैल हुडगे, अशोक पाटील निलंगेकर, अमर खानापूरे, डॉ. सतीश पाचपूते आणि महेश गणगणे या निरीक्षकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT