Nanded Rain News
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकरी सुखावला असून हवामान खात्याने तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनवट तालुक्यात अनेक गावांतील नागरिकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.
जून, जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून आणखी तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १४ ते १७ऑगस्ट या चार दिवसांसाठी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला असून आपत्ती व्यवस्थापनाने याबाबत नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
किनवट तालुक्यातल्या कंचली तांडा येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून पावसातून मार्ग काढावा लागत आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात यापूर्वी अनेक वेळा पक्का पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कंचली तांडासह वेगवेगळ्या दहा गावातील नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन मजबूत पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.