Nanded Protest against Mahavitaran
बिलोली, पुढारी वृत्तसेवा :
बिलोली शहरातील महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२३) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यादरम्यान राज्य महामार्गांवर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करून महावितरणच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मध्यस्थीने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
शहरातील महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे प्रशासकीय कार्यालयातील कामे पूर्णतः ठप्प होत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अव्वाच्या सव्वा वीज बील देवून वीज ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या होत्या.
सदरील तक्रारीची दखल घेत संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करून रास्ता रोको केले. परिणामी राज्यमहामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
सदरील आंदोलनात नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी, कृष्णाताई ठकरोड, गणेश पाटील शिंपाळकर, यशवंत गादगे, लक्ष्मण शेट्टीवार, प्रकाश पोवाडे, मुकिंदर कुडके, बाबू कुडके, शांतेश्वर पाटील, डॉ. मनोज शंखपाळे, शेख सुलेमान यांची समयोचित भाषणे झाली. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पो. नि. अतुल भोसले यांनी चोख बंदोबस्त लावला होता.