नांदेड : पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून शिवसेनेच्या (उबाठा) दोन गटांत मंगळवारी (दि.22) शासकीय विश्रामगृह येथे हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
मेळावा सुरळीत !
विश्रामगृहातील वरील प्रकारानंतर लोकमान्य मंगल कार्यालयातील पक्षाचा मेळावा मात्र सुरळीतपणे पार पडल्याचे दिसून आले. सकाळच्या राड्यानंतर संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी आपल्या भाषणाच्या आरंभी सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे घेताना त्यांचा आदरणीय असा उल्लेख केला.
शिवसेनेचा (उबाठा) गटाचा मंगळवारी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी संपर्क प्रमुख बबन थोरात, खा. नागेश पाटील आष्टीकर, महानगराध्यक्ष प्रकाश मारावार, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, बबन बारसे, ज्योतिबा खराटे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बबन थोरातांनी शिवसेना विकण्याचा उद्योग आजपर्यंत केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते हिंगोली व नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी असताना त्यांनाच पुन्हा नेमणे खेदजनक आहे. आमच्या कुटुंबात तीनवेळा आमदारकी अनेकवेळा नगरसेवक पदे भूषविले. आजचा प्रकार भविष्यातही पुन्हा घडू शकतो. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा.प्रमोद खेडकर, माजी जिल्हाप्रमुख
लोकमान्य मंगल कार्यालयात मेळावा संपन्न झाला. तत्पूर्वी विश्रामगृहात काही प्रमुख पदाधिकारी जमले होते. तेथे वेगवेगळ्या पदांच्या नियुक्तीवरून माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर व मनोज यादव यांच्यात प्रारंभी वाद झाला नंतर हा वाद हाणामारीपर्यंत गेला. शिवसेनेमध्ये पदांची नियुक्ती करताना पैसे घेतले जातात. त्याचा दर किती आहे याचा पाढा बंडू खेडकर यांनी सांगितल्यानंतर वाद आणखीनच वाढत गेला. शाब्दिक वादानंतर हा वाद धक्काबुक्कीवर पोहचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर अनेक
पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप यावेळी केला. काहींनी संपर्क प्रमुखांनाही धक्काबुक्की केली. परंतु स्वतः संपर्कप्रमुख यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांनी मात्र शिवसेनेतील अनागोंदीबाबत जोरदार टीका केली. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व अन्य पदांसाठी किती रक्कम घेतली जाते. हे जाहीरपणे सांगितले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाबाहेरील एकाला उमेदवारी देताना कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना जनाधार नाही, किंवा सामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा नाही अशांना पैसे देऊन पद दिले जातात. शहर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संपर्क प्रमुख थोरात यांच्याविरुद्ध तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. आता महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या फिक्सिंगसाठी संपर्क प्रमुख सक्रिय झाल्याचे सांगताना बंडू खेडकर यांनी शिवसे-नेतून अनेक जण का बाहेर पडत आहेत, याकडेही वरिष्ठांनी लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही.