भाजपा प्रवेश बारगळल्यावर बेटमोगरेकरांच्या सेना प्रवेशाची चर्चा ! file photo
नांदेड

Nanded Political News : भाजपा प्रवेश बारगळल्यावर बेटमोगरेकरांच्या सेना प्रवेशाची चर्चा !

मागील काही महिन्यांत काँग्रेस पक्षापासून दुरावलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर यांचा भाजपातील प्रवेश बारगळल्यानंतर आता ते शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Political News: Betmogrekar joining the Shiv Sena

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील काही महिन्यांत काँग्रेस पक्षापासून दुरावलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर यांचा भाजपातील प्रवेश बारगळल्यानंतर आता ते शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मुखेड तालुक्याच्या राजकारणातील दोन बंधूत ज्येष्ठ असलेले, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आपल्या पत्नीची वर्णी लावून घेतली, तर निवडणूकपूर्व तयारी जोरकसपणे करणारे त्यांचे बंधू दिलीप हे 'माधास्वीर' ठरले; पण तेव्हा त्यांच्या माघारीपेक्षा फसलेल्या पक्षांतराची चर्चा सबंध जिल्हाभर झाली.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत बेटमोगरेकर यांनी १६ जुलै रोजी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानंतर भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची येथील एका हॉटेलमध्ये भेट आणि चर्चा झाली होती. त्यावेळी बेटमोगरेकर यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी दर्शविली; पण मुखेडचे भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी बेटमोगरेकर यांना घाईघाईने प्रवेश देण्यात येऊ नये अशी भूमिका तेथे मांडल्यामुळे नियोजित प्रवेश बारगळला. नंतर आ. राठोड यांनी बेटमोगरेकर बंधू आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी म्हणूनच सोयीचे वाटतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तेथेच त्यांचा बेटमोगरेकरांचा भाजपा प्रवेश बारगळला होता.

यासंदर्भात वृत्तपत्रांत बातम्या आणि समाजमाध्यमांत बरीच राजास चर्चा झाली, तरी बेटमोगरेकर बाँच यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नंतरचे दहा दिवस बँकेच्या निवडणुकीची धामधूम राहिल्यामुळे बेटमोगरेकरांसंदर्भातील राजकीय चर्चा थांबली होती. बँकेच्या निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडल्यानंतर बेटमोगरेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सुरू झाली; पण त्यांनी स्वतः अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मुखेड तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षांतील काही कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये विजय पाटील सुगावकर, गंगासागर रावणगावकर, माजी नगरसेवक संजय रावणगावकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर यांचे भावे किरण पाटील धामणगावकर यांचा समावेश होता. पक्षाचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कबनुरक्कर हेही त्यांच्या प्रवेशप्रसंगी मुंबईत हजर होते.

वरील कार्यकर्त्यांच्या प्रवेशांनतर दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाची माहिती बाहेर आली. मुखेडमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी बेटमोगरेकर यांना शिवसेनेत घेण्यास विरोध केला असल्याची माहितीही समोर आली. वरील पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख कबनुरकर यांच्याशी संपर्क साध्थला असता, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT