Nanded police raid 'Green Tree Thai Spa'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोर चौक परिसरातील 'ग्रीन ट्री थाय स्पा सेंटर'च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत स्पाच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली असून, परराज्यासह स्थानिक तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
शहरातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २४ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना मोर चौकातील 'ग्रीन ट्री थाय स्पा'मध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन शासकीय पंच आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला.
सायंकाळी बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. जास्त पैशांचे आमिष दाखवून पीडित महिलांकडून अवैध वेश्याव्यवसाय करवून स्पा मालक घेतल्याप्रकरणी परमिंदरसिंघ चावला (वय २८, रा. गुरुद्वारा गेट नं. १ जवळ, नांदेड), मॅनेजर महेश पांडुरंग कोकुलवार (वय २२, रा. बालाजी मंदिराजवळ, सिडको, नांदेड) आणि गोविंद संभाजी सूर्यवंशी (वय १८, रा. बुद्ध विहाराजवळ, सांगवी, नांदेड) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या कारवाईत नांदेडसह वडोदरा (गुजरात) आणि जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) येथील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार रितेश कुलथे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अतुल भोसले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व पथकाने ही कारवाई केली. परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा 'डायल ११२' वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.