नांदेड : जिल्ह्यातील अवैध व्यवसाय मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाम रोहन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात १७ जुलै रोजी एकाच वेळी 'मास रेड' (धडक मोहीम) राबवण्यात आली. या धडक कारवाईत पोलिसांनी अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती केंद्र आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकत तब्बल ८ लाख ७१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाम रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पूर्णतः अवैध व्यवसायमुक्त करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि. १७) संपूर्ण जिल्ह्यात विशेष 'मास रेड'चे आदेश दिले होते.
या महामोहिमेत अपर पोलिस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) अधिकारी-अंमलदार आणि सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई केली. खाकीच्या या अचानक पडलेल्या छाप्यांमुळे जुगारी आणि दारू तस्करांची एकच पळापळ झाली.
या धडक मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६७ आरोपींवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाईदरम्यान हातभट्टीचे साहित्य, अवैध दारू आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८ लाख ७१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.