नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राबवल्या जात असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) धडक कारवाई केली. पोलीस पथकाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 'कल्याण मटका' आणि 'तिर्रट' नावाचा जुगार खेळणाऱ्या व चालवणाऱ्या एकूण २१ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रकमेसह ७ मोटारसायकली, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ६६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खुदवी नगर चौरस्ता, हविबिया कॉलनीसमोर धाड टाकली. तेथे लोकांकडून पैसे घेऊन 'कल्याण' मटका खेळवणारे व खेळणारे नासिरखान समश्रेखान, शेख अनसार, शेख शकील, वाजिद खान, महम्मद आसिफ, वाजीद खान अमीरखान, माजीदखान, शेख गौस, उस्मान अहमद अली, महम्मद अफरोज आणि मटका चालक शेख जमीर उर्फ अब्बू या ११ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नगदी रोख रक्कम, ५ मोबाईल आणि मटक्याच्या चिठ्ठ्यांचे रजिस्टर असा ४२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १११३/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोपाळचावडी कॅनॉल रोड लगतच्या मोकळ्या जागेत छापा मारला. तेथे पैशांवर 'तिर्रट' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या शांतुअप्पा मठपती, मोहन राठोड, आनंदा हैबतकर आणि अशोक बनसोडे या ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख ३,६५० रुपये, ५२ हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल आणि १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकली (एमएच-२६, बीएल- ८४६३, एमएच-२६, सीएल- ७२३२, एमएच-२६, झेड- ६९५५) असा एकूण २,२५,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा रजि. क्र. १११४/२०२६ दाखल केला.
तिसरी कारवाई गोपाळचावडी कमानीच्या आत, पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची बातमी मिळताच पथकाने छापा टाकला. तेथे 'तिर्रट' जुगार खेळणाऱ्या कृष्णा हैबतकर, गोरकनाथ गायकवाड, नामदेव कोनापुरे, योगेश दुरनाळे, जालिंदर नॅपनवाड आणि सुभाष धसाडे या ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ११,३०० रुपये रोख, १ लाख १२ हजार रुपयांचे ५ अँड्रॉईड मोबाईल आणि २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली (एमएच-२६, पी-७००२, एमएच-२६, सीटी- ६८०९, एमएच-२६, सीजे- ११९१, एमएच-२६, बीबी- ६२६९) असा एकूण ३,९८,३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी तिन्ही कारवायांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.