Crime News pudhari photo
नांदेड

Nanded Crime : तब्बल २५ वर्षांपासून फरार आरोपी अमरावतीतून जेरबंद!

अपहरणाचा गुन्‍हा होता दाखल; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने तब्बल २५ वर्षांपूर्वीच्या एका गुंतागुंतीच्या अपहरण प्रकरणातील फरारी आरोपीचा यशस्वी छडा लावून त्यास अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

सन २००१ मध्ये पोलिस ठाणे शिवाजीनगर, नांदेड येथे विविध कलमान्‍वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश बबनराव देवकत्ते (रा. श्रावस्तीनगर, नांदेड) हा गुन्हा घडल्यापासून पीडित मुलीसह फरार झाला होता. पोलिस गेल्या अडीच दशकांपासून त्याचा शोध घेत होते, मात्र आरोपी वारंवार आपली ओळख लपवून पोलिसांना चकवा देत होता.

प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना, सहायक पोलिस निरीक्षक गोविंद खैरे यांना खबऱ्यामार्फत पक्की बातमी मिळाली की, सन २००१ मधील या गुन्ह्यातील फरारी आरोपी अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात राहत आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने तातडीने तलई कॅम्प (पो. दिया, ता. धारणी, जि. अमरावती) येथे छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले.

दरम्‍यान, या संदर्भात विचारपूस केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला की, आरोपी प्रकाश बबनराव देवकत्ते (वय ४७, व्यवसाय मजुरी) हा आपली मूळ ओळख लपवून प्रकाश बलदेवसिंघ धानोपाल या खोट्या नावाने राहत होता.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पडताळणी केली असता हाच तो अडीच दशकांपासून पाहिजे असलेला मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी व पीडितेला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक गोविंद खैरे, पोलिस उपनिरीक्षक माधव केंद्रे व अंमलदार ब्रह्मानंद लामतुरे, राजकुमार डोंगरे, विकी कालरा, महिला अंमलदार हन्नुबी शेख यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT