Nanded: Plumber murdered following a minor dispute
नांदेड : पुढारी वृत्तसेवा सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर पेट्रोल विचारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका प्लंबरचा काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गतीने तपास चक्र फिरवत, अवघ्या काही तासांच्या आत दोन्ही फरार आरोपींना नांदेड मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
पवन राजेभाऊ चौधरी (वय २३, रा. गणपती मंदिराजवळ, सोनखेड) आणि बालाजी शिवाजीराव मोरे (वय ३६, रा. दगडगाव रोड, सोनखेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बुधवारी (दि. १०) सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर किफायत अली खाजा मोईनोद्दीन हे उपस्थित होते. यावेळी आरोपींनी त्यांना 'पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे का अशी विचारणा केली. त्यावर किफायत अली यांनी 'मी प्लंबर आहे, तुम्ही पेट्रोल पंपावर विचारपूस करा', असे सांगितले. या किरकोळ उत्तराचा राग मनात धरून आरोपींनी किफायत अली व इतर साक्षीदारांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत किफायत अली यांचा मृत्यू झाला.
गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ११८(१), ११५ (२), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनांश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना आरोपींचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
तपास सुरू असतानाच, पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. सोनखेडमधील खुनाचे आरोपी नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी बसस्थानक परिसरात वेगाने धाव घेऊन सापळा रचला.
संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या पवन चौधरी आणि बालाजी मोरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना सोनखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद करणाऱ्या एलसीबी व सोनखेड पोलिस पथकाचे पोलिस अधीक्षक अबिनांश कुमार यांनी विशेष कौतुक केले आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या प्रकरणातील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली, दोघेजण मयत किफायत अली खाजा मोईनोद्दीन यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली आहे.
यांनी बजावली कामगिरी
एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सोनखेडचे सपोनि भागवत नागरगोजे, एलसीबीचे सपोनि विठ्ठल घोगरे, पोउपनि महेश कोरे, साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, वैशाली कांबळे, दारासिंग राठोड, मोहन हाक्के, सुनील गटलेवार, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कबठेकर आर्दीनी कारवाई केली.