Painganga Wildlife Sanctuary  Pudhari
नांदेड

Painganga Wildlife Sanctuary | पैनगंगा अभयारण्यात जंगलसफारी सुरू करा, खरबीसोबत मन्याळी गेटही खुले करण्याची मागणी

यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमाभागात विस्तारलेले अभयारण्य पैनगंगा नदी, समृद्ध वनसंपदा आणि विविध वन्यजीवांमुळे पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरत आहे

पुढारी वृत्तसेवा

Painganga Jungle Safari Kharbi Gate Manyali Gate

उमरखेड : पावसाळी विश्रांतीनंतर राज्यातील विविध व्याघ्रप्रकल्प आणि वन्यजीव क्षेत्रांमध्ये ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातही जंगलसफारी लवकर सुरू करण्याची मागणी वन्यजीवप्रेमी, स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमाभागात विस्तारलेले हे अभयारण्य पैनगंगा नदी, समृद्ध वनसंपदा आणि विविध वन्यजीवांमुळे पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

ताडोबा, पेंच, मेळघाट यांसारख्या प्रमुख वन्यजीव पर्यटनस्थळांमध्ये ऑक्टोबरपासून सफारी सुरू होत असताना पैनगंगा अभयारण्यातील सफारीचे वेळापत्रकही वनविभागाने लवकर जाहीर करावे, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. सध्या पर्यटनासाठी खरबी गेट हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्यासोबत मन्याळी गेटही पर्यटकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

गेल्या पर्यटन हंगामात पैनगंगाच्या जंगलात वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली होती. यंदाही ‘वनराज’ हा नर आणि ‘अधिरा’ ही मादी वाघाची जोडी परिसरात असल्याने पैनगंगा पर्यटनाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने आवश्यक पर्यटन सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

यवतमाळ-नांदेड सीमाभागातील जंगल, पैनगंगा नदीचे पात्र आणि नदीलगतचा समृद्ध वन्यजीव अधिवास हे या अभयारण्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, पैनगंगा अभयारण्याची निर्मिती १९८६ मध्ये झाली. येथे सागवानासह अर्जुन, मोह, तेंदू यांसारख्या विविध वृक्षप्रजाती आढळतात.

ऑनलाइन बुकिंगची सुविधा द्या

पैनगंगा सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू करण्याची मागणीही पर्यटकांकडून होत आहे. ऑनलाइन प्रवेशिका, सफारीचे वेळापत्रक, उपलब्ध वाहनांची माहिती, गेटनिहाय प्रवेश व्यवस्था आणि शुल्क याबाबतची माहिती अधिकृत डिजिटल माध्यमातून उपलब्ध झाल्यास परजिल्ह्यांतून येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

वन्यजीव पर्यटनाच्या नकाशावर पैनगंगाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी सफारीचा हंगाम वेळेत सुरू करणे, खरबीसोबत मन्याळी गेट खुले करणे आणि ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी आहे. या सुविधांमुळे पर्यटकांची सोय होण्यासोबतच स्थानिक युवक, वाहनचालक, गाईड, होम स्टेचालक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पैनगंगा सफारी सुरू होण्याची अधिकृत तारीख आणि नियमावली वनविभागाकडून कधी जाहीर केली जाते, याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT