कारवाईच्या भीतीपोटी न्यायालयीन प्रक्रियेतून काँग्रेसचा घुमजाव! pudhari photo
नांदेड

Nanded municipal politics : कारवाईच्या भीतीपोटी न्यायालयीन प्रक्रियेतून काँग्रेसचा घुमजाव!

इच्छुक नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेतेपदावर सोडले पाणी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड महानगरपालिका विरोधी पक्ष नेते पदावरून काँग्रेसने केलेला दावा किती खरा आणि किती खोटा याचा निर्वाळा न्यायालयात होण्याआधीच मागील काळे कारनामे बाहेर काढून कारवाई करण्याच्या भीतीपोटी विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसी नगरसेवकांनी महापौरांच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतून घुमजाव केल्याची माहिती समोर आली.

महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड होवून आठवडा लोटला आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेते पद न मिळाल्यास न्यायालयात जाण्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसने अजूनही याचिका दाखल केलेली नाही.

न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रेच काँग्रेसच्या हाती लागले नसल्यामुळे याचिका दाखल होऊ शकली नसल्याचे काँग्रेस वंचित आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे असले तरी न्यायालयात गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांच्या भीतीपोटी काँग्रेसचेच इच्छुक नगरसेवक चालढकल करीत असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मनपातील सर्व घडामोडी व प्रशासकीय कारभारावर खासदार अशोक चव्हाण यांचे बारीक लक्ष आहे. चव्हाण यांच्या आदेशावरूनच महापौर कविता मुळे यांनी विरोधी पक्षनेते पदाची माळ एमआयएमच्या पारड्यात टाकली हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत खंडपीठात याचिका दाखल करून थेट चव्हाण यांच्याशीच पंगा घेणे काँग्रेस नगरसेवकांना परवडणार का? हाही प्रश्न आहे.

मागील काळात मनपाच्या माध्यमातून काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या अनेक कारनाम्याची यादी बाहेर काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयात जावे की नाही या द्विधा मनस्थितीत इच्छुक नगरसेवक असल्याची चर्चा आहे.

... तर कारवाईचा बडगा

सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे न्यायालयीन कामकाज बंद आहे. अशा परिस्थितीत याचिका दाखल कशी होणार? विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आघाडीला मिळणारच नाही हे माहीत असताना आधीच रिट याचिकेद्वारे कॅव्हिएट का दाखल केले नाही? असा प्रश्न काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांने उपस्थित केला आहे. शिवाय न्यायालयात जाण्याची हिंमत केल्यास खा. अशोक चव्हाण कुठे ना कुठे वचपा काढतील अशीही भीती इच्छुक नगरसेवकांना असल्याचे या पदाधिकाऱ्यांने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT