Nanded News: Will not tolerate load-shedding during Diwali; warning from MP Ravindra Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे होणारा त्रास तातडीने थांबवा, अशी आग्रही मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी महावितरणच्या बैठकीत केली. दिवाळीच्या सणात कोणत्याही परिस्थितीत भारनियमन करू नये, शेतकऱ्यांची वीजजोडणी खंडित करू नये तसेच डीपी जळणे, नवीन डीपी मिळण्यास होणारा विलंब आणि सौर कृषिपंपांच्या वितरणातील दिरंगाई यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करता जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच गावातील पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने आणि नियमित वीजपुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुलीबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन थकबाकीच्या कारणास्तव त्यांच्या वीजजोडण्या खंडित करू नयेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बोअरवेलची वीजजोडणी तोडू नये, कारण त्यावरच अनेक शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचे भवितव्य अवलंबून आहे, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात डीपी जळण्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना अनेक दिवस वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. नवीन डीपी बसविल्यानंतरही काही दिवसांत पुन्हा डीपी जळण्याचे प्रकार घडत असल्याने केवळ डीपी बदलून प्रश्न सुटणार नाही.
डीपी जळण्यामागील तांत्रिक कारणांचा शोध घेऊन योग्य क्षमतेचे रोहित्र बसवावे आणि ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सौर कृषिपंप मंजूर होऊनही शेतकऱ्यांना ते वेळेत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून सौरपंपांची मंजुरी, वितरण, बसविणे आणि देखभाल यासाठी स्वतंत्र यंत्रणा व स्वतंत्र मनुष्यबळ उभारण्याची मागणी केली.
गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी असलेल्या स्वतंत्र डीपीवरून अनधिकृतपणे घेतलेल्या वीजजोडण्या तातडीने तपासून खंडित कराव्यात, जेणेकरून पाणीपुरवठा योजनेवर अतिरिक्त भार येणार नाही आणि नागरिकांना नियमित पाणी मिळेल. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळवताना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, डीपीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये आणि वीज समस्यांमुळे पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी महावितरणने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी बैठकीत मांडली.