Nanded News: There is no road to the cemetery in 180 villages of Kinwat taluka!
अरुण तम्मडवार
किनवटः एकीकडे विकासाच्या गगनभरारीच्या घोषणा होत असताना, आदिवासी व दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यात माणसाच्या अंतिम प्रवासाशी निगडित मूलभूत सुविधांची स्थिती अद्यापही गंभीर असल्याचे पंचायत समितीच्या अधिकृत नोंदीतून समोर आले आहे. तालुक्यातील तब्बल १२७ गावांमध्ये स्मशानभूमी शेड व लोखंडी सांगाडा उपलब्ध नाही. त्याचबरोबर १८० गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. यातील केवळ १५ गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा उपलब्ध असून, उर्वरित १६५ गावांमध्ये रस्ता आणि त्यासाठी आवश्यक जागाही उपलब्ध नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती प्रपत्रांमधून समोर आली आहे.
किनवट तालुक्यात १९१ महसुली गावे असून, त्यातील १० बेचिराख गावे तसेच १०७ वाडी-तांड्यांचा मोठा भौगोलिक विस्तार आहे. या सर्व गावांचा कारभार एकूण १३४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाहिला जातो. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने केलेल्या स्मशानभूमी सुविधांच्या आढाव्यात अनेक गावांतील मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे. प्रपत्र 'अ'नुसार आमडी, गोंडजेवली, पिंपरी, मारेगाव, गौरी, तल्हारी, दहेगाव, पिंपळगाव, पाथरी, जलधारा, अंबाडी, निचपूर, इस्लापूर, शिवणी यांसह १२७गावांमध्ये स्मशानभूमी शेड व सांगाडा नसल्याची नोंद आहे.
यातील सर्व गावांमध्ये शेड उभारणीसाठी जागा उपलब्ध असल्याची नोंदही करण्यात आली आहे. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्काराची प्रक्रिया अधिकच क्लेशदायक ठरते. पावसापासून चितेचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकचा आधार घ्यावा लागतो. ओल्या लाकडामुळे चिता पेटवितानाही अडचणी निर्माण होतात. दुःखाच्या प्रसंगी नातेवाइकांना या गैरसोयींना सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असून, संबंधित गावांमध्ये आवश्यक सुविधा तातडीने उभारण्याची गरज आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न त्याहून व्यापक आहे. १८० गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी केवळ १५ गावांमध्ये रस्त्यासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, तब्बल १६५ गावांमध्ये रस्ताही नाही आणि रस्त्यासाठी आवश्यक शासकीय जागाही उपलब्ध नसल्याचे प्रपत्र 'ब'मधील नोंदीतून स्पष्ट होते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल, नाले आणि शेताच्या अरुंद वाटांमधून खांद्यावर तिरडी घेऊन अंत्ययात्रा न्यावी लागण्याची वेळ अनेक ग्रामस्थांवर येते.
स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. तालुक्यातील १८० गावांमध्ये स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत नसल्याची नोंद आहे. यापैकी केवळ बैदी या एका गावात संरक्षक भिंतीसाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रपत्रात नमूद आहे. उर्वरित १७९ गावांमध्ये संरक्षक भिंतीसाठी आवश्यक जागाही उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
कुंपण नसल्यामुळे मोकाट जनावरे, डुकरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर थेट चितेच्या जागेवर असतो. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अस्थी व चितेची राख जनावरांकडून तुडवली जाते, तर अनेकदा भटक्या प्राण्यांकडून अमानुष प्रकार घडण्याची भीती कायम असते. त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेचे संरक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.
मृत्यूनंतरच्या अंतिम संस्कारासाठी आवश्यक असलेल्या शेड व लोखंडी सांगाड्यापासून रस्त्यापर्यंत आणि संरक्षक भिंतीपर्यंतच्या मूलभूत सुविधांचा एवढा मोठा अभाव असल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांच्या अंतिम प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेडसाठी जागा उपलब्ध असलेल्या १२७ गावांत तातडीने बांधकामे हाती घेणे, रस्त्यासाठी जागा उपलब्ध असलेल्या १५ गावांमध्ये मार्गाची कामे पूर्ण करणे आणि उर्वरित १६५ गावांतील रस्त्याचा प्रश्न जागेच्या उपलब्धतेसह मार्गी लावणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे संरक्षक भिंतीसाठी जागा उपलब्ध नसलेल्या १७९ गावांमध्ये पर्यायी व्यवस्था निश्चित करण्याची गरज आहे. जिवंतपणीच्या विकासाइतकीच मृत्यूनंतरच्या सन्मानाचीही जबाबदारी प्रशासनाची आहे; त्यामुळे या नोंदी आता कागदावर न राहता प्रत्यक्ष सुविधांमध्ये कधी रूपांतरित होणार, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केल्या जात आहे.