महाएल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे निवेदन तहसील व पोलीस प्रशासनाला देण्यात आले Pudhari Photo
नांदेड

Nanded News | सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी सिरपल्लीत ९ ऑगस्‍टला महाएल्गार बैठक

विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त बैठक : हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांना विस्‍थापित करण्याचा डाव असल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

हिमायतनगर प्रतिनिधी : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात नदीकाठच्या स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध गावात बैठक घेऊन कडाडून विरोध केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर सिरपल्ली येथे दिनांक ०९ ऑगस्ट रोजी महाएल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाबैठकीला चिमटा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या प्रमुखांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

विदर्भ मराठवाड्यातील पैनगंगा नदीवरील हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा येथे नियोजित सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर लादला जात असून, यामुळे कोरडवाहू सह बागायती शेतीची सुपीक जमीन उध्वस्त होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील कामारी, घारापूर, डोल्हारी, कौठा, एकंबा यासह उमरखेड तालुक्यातील विविध गावात बैठका घेऊन सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाला विरोध केला जात आहे. तसेच प्रकल्पाच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवला जात असून, पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन उग्र करण्याच्या तयारीत संघर्ष समिती एकजूट झाली आहे.

धरण विरोधी संघर्ष समितीकडून शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दिनांक ०९ ऑगस्ट रोजी महाएल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे निवेदन तहसील व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यात म्हंटले आहे कि, पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या हिमायतनगर - उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पच्या मंजुरीमुळे नदीकाठच्या शेतकरी बांधवात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सरकारने तत्काळ हा प्रकल्प रद्द करावा यासाठी आयोजित बैठकीस नदीकाठावर असलेल्या सर्व गावातील शेतकरी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन अनिल बापूराव जाधव, सगुण आनंदराव शिंदे, मिलिंद मदनराव जाधव, भास्कर श्रीधर जाधव, सुदर्शन भारत पवार, अनिल दिगंबर फाळके यांनी केले आहे.

सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेती बाधित होऊन लोकांचे घरटं उद्ध्वस्त होणार आहे. तसेच नैसर्गिक संपत्तीचाही ऱ्हास होईल. सरकारने आमचा आवाज ऐकला नाही तर पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन उग्र करण्याच्या बाबतीत चर्चा महाएल्गार बैठकीत केली जाणार आहे. खास म्हणजे चिमटा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या प्रमुखांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार अशी माहिती संघर्ष समितीची लोकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT