Nanded News : Officials of animal husbandry department interacted with villagers
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लोहा तालुक्यातील आंडगा (दक्षिण) येथे संयुक्त क्षेत्रीय भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
आंडगा (दक्षिण) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मन्याड (लिंबोटी) धरणावरील विद्युत मोटारींचा वीजपुरवठा दररोज दोन ते तीन तास सुरू ठेवून जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जनावरांसाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसेच विद्युत मोटारींच्या वीजपुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली. परिसरात उपलब्ध असलेल्या वाळलेल्या चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत तसेच पशुधनासाठी संतुलित आहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.