Nanded News : गोदावरी पात्रातून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त file photo
नांदेड

Nanded News : गोदावरी पात्रातून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैध धंदे आणि वाळूमाफियांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News : Goods worth ₹40 lakh seized from the Godavari riverbed

नांदेड : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवैध धंदे आणि वाळूमाफियांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतील 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत उस्माननगर पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर धाडसी कारवाई केली आहे.

या कारवाईत दोन मोठ्या फायबर बोटी, एक इंजिन बोट आणि १० ब्रास वाळूसह तब्बल ४० लाख ३३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जप्त केलेल्या अवजड बोटी हलवणे अशक्य असल्याने महसूल प्रशासनाच्या मदतीने त्या जिलेटिनचा स्फोट करून जागीच नष्ट करण्यात आल्या, ज्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त बातमीदाराच्या 'टिप'वर पडला छापा उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक हे आपल्या पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मौजे वेळी (ता. लोहा) येथील गोदावरी नदी पात्रातून बोटीच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ येळी शिवारातील आनंदा नारायण ढंगे यांच्या शेताजवळील गोदावरी नदीच्या पात्रात छापा टाकला. पोलिसांचे पथक येताना पाहताच बोटीवरील वाळू उपसा करणारे इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

मुदखेडच्या दोन बोट मालकांवर गुन्हा दाखल याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग पिराजी कल्लेवार (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात बोट मालक दिनेश दशरथ गाढे (रा. चिलपिंपरी, ता. मुदखेड) आणि विश्वनाथ सूर्यभान आंबेकर (रा. शंखतीर्थ, ता. मुदखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप (कंधार) यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगरचे सपोनि महेश मुळीक, एएसआय श्याम वडजे, पोहेकॉ गंगाधर चिंचोरे, बजरंग कल्लेवार, प्रकाश पेदेवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल माधव पवार यांच्या पथकाने केली.

महसूल प्रशासनाचा पंचनामा आणि थेट 'ब्लास्ट'

सपोनि महेश मुळीक यांनी तात्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क साधून खातरजमा केली असता, नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महसूलचे ग्राम अधिकारी मोतीराम पवार व नेताजी रायाजी यांना घटनास्थळी पाचारण करून रीतसर पंचनामा करण्यात आला, घटनास्थळावरून जप्त केलेल्या दोन मोठ्या लोखंडी फायबर बोटी आणि एक छोटी इंजिन बोट प्रचंड अवजड असल्याने त्या जाग्यावरून हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवून आणत या तिन्ही बोटी जागीच जलसमाधी देऊन नष्ट करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT