नांदेड

Electricity Nanded News: घुंगराळ्यासाठी गावठाण सेपरेशनअंतर्गत १०० केव्हीचे पाच डीपी मंजूर

तीन डीपी बसवून पूजन, दोन लवकरच कार्यान्वित होणार

पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब पांडे

नायगाव : गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वाढत्या विजेच्या भाराची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने घुंगराळा गावासाठी गावठाण सेपरेशन अंतर्गत १०० केव्ही क्षमतेचे पाच नवीन डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी यासाठी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

गावात यापूर्वी विविध ठिकाणी २५ केव्ही क्षमतेचे सिंगल फेज डीपी कार्यरत होते. वाढत्या लोकसंख्येसह घरगुती वीज वापर आणि विद्युत भार वाढल्यामुळे या डीपीवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच इतर तांत्रिक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन वसंत सुगावे पाटील यांनी गावठाण सेपरेशन योजनेअंतर्गत जुन्या डीपीच्या जागी अधिक क्षमतेचे नवीन थ्री-फेज डीपी मंजूर करण्याची मागणी महावितरणकडे केली होती. यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत महावितरणकडून गावातील सुगावे डीपी, मारोती मंदिर डीपी, जिल्हा परिषद शाळा डीपी, मागासवर्गीय स्मशानभूमी डीपी आणि मागासवर्गीय स्मशानभूमी डीपी क्रमांक दोन अशा पाच ठिकाणी प्रत्येकी १०० केव्ही क्षमतेचे नवीन डीपी मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी तीन डीपी प्रत्यक्ष बसविण्यात आले असून ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. उर्वरित दोन डीपीदेखील लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा

नवीन क्षमतेचे डीपी कार्यान्वित झाल्यामुळे गावातील विद्युत भाराचे योग्य पद्धतीने विभाजन होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे डीपीवर येणारा अतिरिक्त भार कमी होऊन वारंवार वीज जाण्याची समस्या, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ग्रामस्थांना अधिक सुरळीत आणि स्थिर वीजपुरवठा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पाच नवीन डीपी मंजूर करून गावाची विजेची समस्या दूर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महावितरणचे अधीक्षक अभियंता खंडारे, कार्यकारी अभियंता पेंढारकर, उपअभियंता पाटील आणि कनिष्ठ अभियंता जाधव यांचे वसंत सुगावे पाटील यांनी आभार मानले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन चंद्रप्रकाश ढगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव ढगे, संभाजी तुरटवाड, प्रल्हाद सुगावे, शंकर मामा यलपलवाड, प्रल्हाद ढगे, व्यंकटराव कंचलवाड, गोविंदराव बानेवाड, घुंगराळाचे माजी उपसरपंच शिवाजी ढगे, माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी हाळदेवाड, मुरारी तुरटवाड, मारोती अलगटलेवार, माधव जलदेवार, संतोष पांचाळ, खंडु ढगे, सतीश सुगावे, मोहन सुगावे, अनिल सुगावे, राजू सूर्यवंशी, प्रकाश गजभारे, कॉन्ट्रॅक्टर माधव पांडे, लाईनमन पांचाळ, लाईनमन हावरगे, गोविंद कंचलवाड, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र ढगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT