Nanded News : देगलूर शहर अतिक्रमणासह वाहतूक कोंडी समस्यांच्या विळख्यात file photo
नांदेड

Nanded News : देगलूर शहर अतिक्रमणासह वाहतूक कोंडी समस्यांच्या विळख्यात

पोलिस व न.पा. प्रशासनाच्या नाकर्तेपणावर नागरिकांतून चीड

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Deglur city gripped by issues of encroachment and traffic congestion

फजल मुल्ला

देगलूर : शहराच्या मुख्यरस्त्यासह शहरातील भागात झपाट्याने अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा होत आहे तर अनेक अपघात घडून निष्पाप जनतेचे जीव जात आहे. तरी देखील पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही. शहरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर फिरणे व सामान्य जीवन जगणे अवघड झाले आहे.

देगलूर शहर हे तेलंगाणा, कर्नाटक सीमेवरील नांदेड शहरानंतर महत्त्वाचे आणि मोठे शहर समजले जाते. तालुक्यात होट्टल, येरगी येथे ऐतिहासिक संग्रहाचा ठेवा आहे. शहरात वै. धुंडा महाराज मठ, रफाई दर्गा यासह कांही पवित्र मंदिरे आहेत. तालुक्यात रामपूर, करडखेड सारखी देवस्थाने आहेत. येथूनच बिदर येथील नानक झिरा या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो शिख भाविक येथूनच ये-जा करतात.

तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या देगलूर शहरातील सराफा मार्केट, कापड मार्केट, भांडी मार्केट खूप मोठे आहेत. तर जनावरांचा खूप मोठा बाजार भरतो; त्यामुळे परराज्यातून व परिसरातून शेकडो किलोमीटर अंतरापासून नागरिक येथे विविध कामासाठी मोठ्या संख्येने येत असतात. एकीकडे जवळपास १ लाख लोकसंख्या असलेले देगलूर शहर ऐतिहासिक रूपात प्रसिद्ध होत असतानाच दुसरीकडे शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, नाल्याची दुर्गंधी रस्त्यावर कचरा आर्दीमुळे शहराची नाचक्की होत आहे.

सध्या सणासुदीचे व लगसराईचे दिवस सुरू आहेत. विविध कार्य-प्रसंगाला अनुसरून खरेदी करण्यासाठी महिला, मुली, पुरूष नागरिक बाजारात येतात. मात्र त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. नवीन बसस्थानक गोकुळनगर-मोंढा, नवीन बसस्थानक अमरदीप हॉटेल, नांदेड रोडवर छत्रपती शिवाजी उद्यानाशेजारी मोठा हनुमान मंदिर, साळवणातील मारोती मंदिर लाईन गल्ली जुना सराफा हनुमान मंदिर, जुने बसस्थानक शहाजी नगर जुना दवाखाना इमारत जुनी नगरपरिषद इमारत-नगरेश्वर मंदिर, न्यू भारत फॅन्सी लोहिया मैदान, प्रजापिता ब्रह्मकुमारी कार्यालय पोलीस कॉलनी शहाजीनगर, अण्णाभाऊ साठे चौक गांधी पुतळा नवीन सराफा, गांधी पुतळा - जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांचे) लाईनगल्ली देगाव नाका, बसवेश्वर पुतळा लोहिया मैदान, हनुमान मंदिर-मच्छी मार्केट, मोंढा रोड-जुनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद या अत्यंत वर्दळीच्या भागात व भांडे मार्केटमध्ये दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर जवळपास ५-५ फूट अतिक्रमण करून सामान सजविले आहे.

कांही भागातील रस्त्यावर संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत दुतर्फा दुचाकी लावून रस्त्यात अडथळा निर्माण केला जातो त्यामुळे दोन दिवसांपुर्वीच नांदेड-हैद्राबाद रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला तर अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

लोहिया मैदानातील व शिवाजी उद्यानालगत, जुने बसस्थानक समोर फळ विक्रेत्यांचे गाडे, त्यांच्यासमोरच रस्त्यावर उभे करण्यात आलेले होतो येथूनच पुढे मार्केटमध्ये जाणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलांना खूप त्रास होतो. हनुमान मंदिर, मोंढा रोडच्या तोंडावर उभ्या करण्यात आलेल्या ऑटोमुळे देखील जनतेला त्रास होत आहे.

गणेशक्ष उत्सव, दुर्गा उत्सव, रमजान ईद, गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठक प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोर नेहमी प्रमाणे अतिक्रमणामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल चर्चा केली जाते. परंतु प्रशासनाने त्यावर कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे देगलूरातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने मार्केट मधील झालेले अतिक्रमण त्वरित काढून घेण्यास दुकानदारांना भाग पाडावे तसेच पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT