Nanded News : बिहारमधील महाविजयानंतर भाजपाचा शहरात आनंदोत्सव File Photo
नांदेड

Nanded News : बिहारमधील महाविजयानंतर भाजपाचा शहरात आनंदोत्सव

महाराष्ट्रात पोषक वातावरण झाल्याचा दावा; बिनबुडाचे आरोप जनतेने नाकारले : खा. चव्हाण

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: BJP celebrates in the city after its great victory in Bihar

विशेष प्रतिनिधी

नांदेड : बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांसह अभूतपूर्व महाविजय मिळविल्यानंतर भाजपाने देशभर सुरू केलेल्या जल्लोषात या पक्षाचे नांदेडमधील नेते-पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले. शहराच्या आयटीआय चौकात शहर आणि जिल्हा भाजपाने पक्षनेते खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविजयाचा आनंद व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जनमत चाचण्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने कौल दिला होता. त्यातील अंदाजापेक्षाही मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने शुक्रवारी दुपारनंतर दिवाळीनंतरची दिवाळी साजरी केली. ढोल-ताशे, गुलालाची उधळण करून महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातर्फे उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतील १२ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून भाजपाचे नेते आणि पदाधिकारी ठिकठिकाणचे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतानाच बिहारच्या यशाने आम्हाला महाराष्ट्रात पोषक वातावरण निर्माण करून दिल्याची भावना पक्षाचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनी येथे व्यक्त केली.

या विजयोत्सवामध्ये आ. भीमराव केराम, आ. जीतेश अंतापूरकर, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रवीण साले, आवण भिलवंडे, विजय येवनकर, विजय गंभीरे, बलवंतसिंग गाडीवाले, वीरेन्द्रसिंग गाडीवाले, शीतल खांडील, बाळू खोमणे, मनोज भंडारी, प्रताप पावडे, किशन कल्याणकर, दिनकर दहीफळे, दुष्यंत सोनाळे, राजू यन्नम, व्यंकट मोकले, व्यंकटेश साठे, अमित वाघ, महिला मोर्चाच्या ज्योती कल्याणकर, शीतल भालके, महादेवी मठपती यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

खा. अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएचा विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण विजय आहे. एनडीएला मोठे बहुमत मिळाले असून, महागठबंधनची अवस्था दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची उत्तम प्रतिमा आणि भाजप जेडीय सरकारच्या माध्यमातून बिहारमध्ये झालेला विकास याचा परिपाक म्हणजे हा विजय आहे.

या विजयासाठी मी या तिन्ही नेत्यांचे आणि बिहारमधील सर्व कार्यकत्यांचे व मतदारांचे अभिनंदन करतो. भाजपवर बिनबुडाचे आरोप करायचे, मतचोरीचा ठपका ठेवायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार जनतेने नाकारला आहे. बिहारचा निवडणूक निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुद्धा भाजप युतीचा विजय निश्चित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT