

The book stall at the railway station has finally closed.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बसस्थानकावरील पुस्तके व वृत्तपत्रांचे स्टॉल तीन महिन्यांपूर्वी बंद झाल्यानंतर दिवाळीनंतर रेल्वे स्थानकावरील स्टॉल सुद्धा बंद झाले. या माध्यमातून एका इतिहासाची इतिश्री झाली आहे.
मागील २२ वर्षापासून अशोक जैन हे नांदेड रेल्वे स्थानकावर ए. एच. व्हीलर या कंपनीच्या वतीने वृत्तपत्रे व पुस्तकांचे दुकान चालवत होते. तत्पूर्वी ही जबाबदारी श्री. शहा यांनी अनेक वर्ष सांभाळली. नांदेड शहर विकासाच्या दृष्टीने अगदी बाल्यावस्थेत होते आणि वृत्तपत्र क्षेत्र सुद्धा संकुचित होते, तेव्हा बस स्थानक व रेल्वे स्थानकावरील स्टॉल्सनी नांदेडकरांची वाचनाची गरज व भूक भागवली.
सत्तरच्या दशकात ग. वा. बेहेरे यांचे सोबत व अरुण ताम्हणकर यांचे श्री ही साप्ताहिके खरेदी करण्यासाठी नांदेडकर रेल्वे स्थानकावर रांगा लावत असत. तर सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, केसरी ही वृत्तपत्रे एक दिवस उशिरा रेल्वेच्या माध्यमातूनच नांदेड येथे पोहोचत. मुंबई व हैदराबाद इथून मराठी, इंग्रजी नियतकालिके किंवा पुस्तके नांदेडला येत असत.
दरम्यान कालौघात मोबाईलमुळे वाचन संस्कृती संपुष्टात येत चालली आहे. काही दर्दी वाचक आजही आहेत; परंतु तो वर्ग वेगळा आहे. प्रवासात वाचणाऱ्यांना गूढ कथा, गुलाबी कथा, हेरकथा, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, राशिभविष्य, पाककला यासारखे साहित्य लागते. या सर्व बाबी अधिक आकर्षक व विस्तारित रूपात विनामूल्य मोबाईलवर उपलब्ध झाल्याने पदरमोड करून कोणताही प्रवासी पुस्तके किंवा वृत्तपत्रे विकत घेईनासा झाला.
दरम्यान रेल्वे विभागाने सुद्धा बुक स्टॉलचे रूपांतर बहुउद्देशीय स्टॉल्समध्ये करायचा निर्णय अमलात आणला आहे. दुसरीकडे पुस्तके व वर्तमानपत्रांचे ग्राहक नगण्य उरल्याने स्टॉल चालकांचासुद्धा उत्साह मावळला व हे स्टॉल चालवणे आर्थिक भुर्दंड ठरू लागले. त्यामुळे तीन चार महिन्यांपूर्वी श्री. योगी यांनी बसस्थानकावरील स्टॉल बंद केले तर सुमारे महिनाभरापूर्वी रेल्वे स्थानकावरील श्री. जैन यांचे स्टॉलसुद्धा बंद झाले आहे. या माध्यमातून एका इतिहासाची इतिश्री झाली.
आता परवडत नाही
अंशुल जैन यांनी सांगितले की, आता वडिलांची प्रकृती ठीक राहत नाही. शिवाय स्वतःला अन्यत्र व्यवसाय करायचा आहे, म्हणून स्टॉल बंद केले तर श्रीपाद योगी यांनी सांगितले स्टॉल चालवणे आता परवडणारे राहिले नाही. कारणे काहीही असले तरी दोन्ही ठिकाणचे स्टॉल बंद झाले, ही वस्तुस्थिती आहे.