नांदेड

Nanded news: ३० वर्षांची प्रतीक्षा संपली! बरबडा–बिलोली बससेवा पुन्हा सुरू

सुगावे पाटील–बडुरे यांच्या पाठपुराव्याला यश; विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : अनेक वर्षांपासून बंद असलेली बरबडा–बिलोली बससेवा अखेर पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ३० वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाल्याने बरबडा, पाटोदा, कहाळा, कुष्णूर, घुंगराळा, नायगाव, नरसी आदी गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील तसेच माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून ही मागणी लावून धरल्यामुळे अखेर बससेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

या बससेवेचा सर्वाधिक फायदा शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शासकीय कामकाज, आरोग्यसेवा, बाजारपेठ व दैनंदिन प्रवासासाठी जाणाऱ्या नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

नव्या वेळापत्रकानुसार ही बस दररोज सकाळी ६.१५ वाजता बरबडा येथून सुटून ७.३० वाजता बिलोली येथे पोहोचणार आहे. तसेच सायंकाळी ६.१५ वाजता बिलोली येथून सुटून ७.३० वाजता बरबडा येथे मुक्कामी पोहोचणार आहे. त्यामुळे सकाळच्या व सायंकाळच्या प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

बससेवेच्या प्रारंभी आज सकाळी वाहक व चालक यांचा वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बसला शुभेच्छा देत प्रवाशांसह गाडी रवाना केली. या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सुगावे पाटील आणि विश्वनाथ बडुरे यांचे आभार मानले.

यावेळी लक्ष्मण कोम्पलवाड, भास्करराव धर्माधिकारी, रामकिशन तीपलवाड, नागण सुरेवाड, बाबू रुद्रवाड, दिगंबर भुसालवाड, महाजन अंबुलगे, माधव शेवाळे, वायद शेख, महेबूब शेख, गंगाधर शिंगेवाड, प्रकाश गिरे, आनंदा पोटानवार, आनंदा रेजितवाड, मालकाजी घोसलवाड, यशवंत मदेवाड, प्रल्हाद जेटेवाड, उत्तम जेटेवाड, बालाजी शेवाळे, किरण हणमंते, अंकुश हणमंते, भगवान शेवाळे, दिगंबर जेटेवाड, लिंगोजी वाटपलवाड, व्यंकटी आलमवाड, पोचिराम धुमाळे, गोविंद धर्माधिकारी, शंकर कोम्पलवाड, माधव इंद्रवाड, बाबू मदेवाड, बाबू जेंगिलवाड, विक्रम मदेवाड, पांडुरंग जेटेवाड, शिवणा पुरमवाड, शिवाजी थेटे, व्यंकटी थेटे, बालाजी मेंकुदळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT